Join us  

Multibagger Share : लखपती शेअर! ११ रुपयांपासून झाली होती सुरूवात, आज १ लाखांजवळ पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 3:01 PM

या शेअरनं अनेक गुंतवणूकदारांना लखपती केलंय.

शेअर बाजारातीलगुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक मानली जाते. अनेकदा काही जणांना यात मोठा नफाही होतो, तर काही जणांना नुकसान. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करणं महत्त्वाचं असतं असं म्हटलं जातं. असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं नशीब पालटलंय. असाच एक स्टॉक सध्या खूप चर्चेत आहे. ११ रुपयांपासून शेअर बाजारात प्रवास सुरू करणाऱ्या या शेअरने गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. या मल्टीबॅगर स्टॉकनं आपल्या गुंतवणूकदारांना विक्रमी कमाई करून दिलीये. या शेअरची किंमत आता १ लाखाच्या जवळ पोहोचलीये.

टायर कंपनी एमआरएफच्या (MRF) शेअर्सनं शेअर बाजारात नवा विक्रम रचला आहे. सोमवारी कंपनीचा शेअर एक लाख रुपयांच्या जवळ पोहोचला. सोमवारी एमआरएफचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) ९९,९३३.५० रुपयांवर पोहोचला होता. एमआरएफच्या एका शेअरची किंमत सोमवारी १ लाख रुपयांच्या जवळ पोहोचली. एक लाखापासून हा शेअर केवळ ६६.५० रुपये दूर राहिला. सोमवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात एमआरएफचे शेअर्स ९७,७५० रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे, मंगळवारी शेअरनं पुन्हा वेग पकडला होता. दुपारच्या सुमारास एमआरएफचे शेअर्समध्ये ०.०९ टक्क्यांनी वाढ होऊन तो ९७८४६.१० रुपयांवर पोहोचला.

वर्षभरात मोठी वाढ

सोमवारनंतर मंगळवारी एमआरएफच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. गेल्या एक वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर एका वर्षात एमआरएफचा शेअर ३१,३५५ रुपयांनी वाढला आहे. एमआरएफच्या शेअरची किंमत ९ मे २०२२ रोजी ६८,५७८ रुपये होती, जी ८ मे २०२३ रोजी ९९,९३३.५० रुपयांवर पोहोचली. 

११ रुपयांपासून सुरूवात

१९९३ मध्ये जेव्हा एमआरएफनं शेअर बाजारात आपला प्रवास सुरू केला तेव्हा त्याची किंमत ११ रुपये होती. सोमवारी व्यवहारादरम्यान शेअर एका टप्प्यावर ९९,९३३.५० रुपयांवर पोहोचला होता. या शेअरमध्ये तेजी येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शेअर स्प्लिट न होणं म्हटलं जातंय. कंपनीचे मार्केट कॅप ४.१७ ट्रिलियनवर पोहोचलं आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक