United Spirits Ltd Share Price: शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची असते, पण कधी-कधी एखादा शेअर बंपर कमाई करुन देतो. असा एखादा शेअर हाती लागला की, गुंतवणूकदार एका झटक्यात श्रीमंत होतात. पण, यासाठी अनेकदा संयम बाळगणे आवश्यक असते. आम्ही तुम्हाल अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन दिली.
आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, ती ब्रिटिश मल्टिनॅशनल कंपनी डियाजिओच्या मालकीची युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले. सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरने सुमारे 16000 टक्के रिटर्न्स दिले आहेत. एखाद्या व्यक्तीने सुरुवातीला या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला आज 16 लाख रुपये मिळाले असते.
22 वर्षांपूर्वी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा शेअर 6.55 रुपयांवर होता. आता हा शेअर गुरुवारी(दि.2) 1057.75 रुपयांपर्यंत वाढला. शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1,097.40 रुपये आणि निम्न पातळी 730.90 रुपये आहे. ही कंपनी मॅक्डॉवेल, रॉयल चॅलेंज, सिग्नेचर, जॉनी वॉकर आणि ब्लॅक डॉग या नावाने मद्य तयार करते. गेल्या एका महिन्यात हा शेअर 6 टक्क्यांहून अधिक वाढला, तर सहा महिन्यांत सुमारे 35 टक्के परतावा दिला आहे.