शेअर बाजाराला (Stock Market) जोखमीचा व्यवसाय म्हटलं जात असले तरी त्यात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. यातील अनेकांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत श्रीमंत केले आहे, तर अनेक शेअर्सनी अत्यंत कमी कालावधीत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक आयटी शेअर म्हणजे वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेडचा (One Point One Solutions Share), ज्यानं चार वर्षांत १ लाख रुपयांची गुंतवणूकीचं मूल्य ४० लाख केलं आहे.
शेअरची किंमत ५८ रुपयांपार
शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा (Multibagger Stock) दिला आहे. स्मॉलकॅप कंपनी वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर जवळपास चार वर्षांच्या कालावधीत या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना ३६०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरचा भाव १.५८ रुपयांवरून आता ५८.६५ रुपयांवर पोहोचला आहे.
चार वर्षांत पैशांचा वर्षाव
आयटी सेवा पुरविणाऱ्या या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर २९ नोव्हेंबर २०१९ रोजी केवळ १.५८ रुपयांवर होता, जो आदल्या दिवशी शनिवारी ५.०१ टक्क्यांच्या जोरदार वाढीसह ५८.६५ रुपयांवर बंद झाला. शनिवारी झालेल्या विशेष ट्रेडिंग सत्रात हा शेअर ५६.८० रुपयांवर व्यवहार करत होता आणि नंतर ५८ रुपयांच्या अपर सर्किटवर गेला. गेल्या ५ दिवसात शेअरच्या किंमतीत १९.६९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
वर्षभरात पैसे दुप्पट
गेल्या वर्षभराचा विचार केला तर या आयटी शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांची रक्कम दुपटीहून अधिक वाढवली आहे. या शेअरनं वर्षभरात १६३.६० टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल उत्कृष्ट होते आणि या दरम्यान कंपनीच्या निव्वळ नफ्यात १०५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)