Mutual Fund News : फिक्स्ड डिपॉझिट (FD) आजही अनेक लोकांची पहिली पसंती आहे. आजकाल, बँका पाच वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ७.५ टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा देत आहेत. परंतु यासह एक समस्या आहे. तुम्ही ज्या आयकर ब्रॅकेटमध्ये येत आहात त्यानुसार या रिटर्नवर कर आकारला जातो. जर तुम्ही ३० टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल तर FD चे रिटर्न सुमारे ५ टक्के असेल. यापासून वाचण्यासाठी आतापर्यंत म्युच्युअल फंड उपाय देत होता.
तुम्ही तीन वर्षांपेक्षा जास्त काळ पैसे ठेवल्यास, तुम्ही डेट म्युच्युअल फंडाची निवड करू शकता. तेथे मिळणाऱ्या रिटर्नवर खूपच कमी कर आकारला जातो. खरंतर, तेथील परताव्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन लागू होईल, ज्यामुळे कर फक्त २० टक्के असेल. इतकंच नाही तर महागाईचा तुमच्या रिटर्नवर काय परिणाम होईल हेदेखील पाहावं लागेल.
इतका मिळेल रिटर्न
जर एफडी आणि डेट फंड दोन्हीत एक एक लाख तुम्ही जमा केले आणि त्यावर तुम्हाला ७.५ टक्के रिटर्न मिळाला असं आपण मानू. यामुळे २४,२३० रुपयांचा लाभ झाला. जर तुम्ही ३० टक्के आयकर ब्रॅकेटमध्ये असाल तर तुम्हाला एफडीवर ७,२६९ रुपये कर भरावा लागेल. म्हणजेच, एफडीवर प्रत्यक्ष परतावा ५.३६ टक्के राहिला. डेट फंडाच्या बाबतीत, प्रथम महागाईचा खर्च देखील गुंतवणुकीच्या रकमेत जोडला जाईल. त्यासाठी कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सचा आधार घेतला जातो. परिणामी, गुंतवणूक एक लाखापेक्षा जास्त मानली जाईल. यामुळे कमी नफ्यावर कर मोजला जाईल. त्यावरही फक्त २० टक्के कर असेल. अशा प्रकारे, डेट फंडांवरील वास्तविक परतावा ७ टक्क्यांच्या जवळ असू शकतो.
आणखीही फायदे
तुम्ही डेट म्युच्युअल फंडातून पैसे काढेपर्यंत वर्षांचा विचार न करता तुमचा कर टाळला जातो. तुम्ही FD मध्ये पैसे काढले नाही तरी, रिटर्नवर वार्षिक आधारावर कर भरावा लागतो. FD मधून एका वर्षात ४० हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई होत असेल तर बँका १० टक्के TDS कापतात. जर तुम्हाला टॅक्स लागत नसेल तर दरवर्षी तुम्हाला फॉर्म १५ जी किंवा १५ एच भरावा लागेल. डेट फंडात या गोष्टींचा त्रास होत नाही.
आता होऊ शकतात समस्या
डेट फंडाची सर्वात मोठं आकर्षण आता संपणार आहे. ज्या डेट फंडात इक्विटीचा हिस्सा ३५ टक्के किंवा यापेक्षा कमी असेल त्यात कमी टॅक्सचा फायदा बंद होणार आहे. त्या ठिकाणी लाँग टर्म कॅपिटल गेनच्या आधारावर २० टक्के टॅक्स आणि महागाई इंडेक्सचा फायदा मिळणार नाही. सरळ शब्दांमध्ये सांगायचं झालं तर अशाप्रकारच्या डेट फंडावर एफडीप्रमाणेच टॅक्स द्यावा लागेल. फायनॅन्स बिलमध्ये याची तरतूद करण्यात आली आहे आणि ते पारितही झाले आहे. गोल्ड फंडमध्येही अशा प्रकारचा लाभ संपवण्यात आलाय.
दीर्घ मुदतीवर परिणाम
ट्रस्ट म्युच्युअल फंडाचे सीईओ संदीप बागला यांना विश्वास आहे की दीर्घ मुदतीत याचा परिणाम होईल. गेल्या एक-दोन वर्षांत डेट स्कीममधून पैसा बाहेर आला आहे. पैसे फक्त टार्गेट मॅच्युरिटी फंड्समध्ये आले, ज्यामध्ये पैसे सरकारी सिक्युरिटीजमध्ये जमा केले जातात, जे FD सारखे रिटर्न देण्याचा प्रयत्न करतात आणि कर लाभ मिळवतात. त्यांचे गुंतवणूकदार तीन वर्षांनंतरही त्यांची गुंतवणूक काढून घेऊ इच्छित नाहीत. जोपर्यंत पैसे काढले जात नाहीत तोपर्यंत कर वाचत राहणार आहे. आता पैसा फक्त त्या फंडांमध्ये जाईल, जे गुंतवणूकदारांसाठी महागाईला मात देणारे रिटर्न देतात.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)