Join us  

"अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया; समाजातील प्रत्येक घटकाला बळ मिळणार" - PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 3:32 PM

"अर्थसंकल्प देशातील हजारो खेड्यांना, गरीबांना, शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे."

Narendra Modi On Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज(दि.23) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधक टीका करत आहेत, तर NDA तील नेत्यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन मध्यमवर्गाला बळ देणारा अर्थसंकल्प, असे केले आहे. तसेच,  आजचा अर्थसंकल्प भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनविण्याच्या प्रक्रियेत मुख्य स्रोत म्हणून काम करेल आणि विकसित भारताचा भक्कम पाया घालेल, असेही ते म्हणाले. 

समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारा अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प देशातील हजारो खेड्यांना, गरीबांना, शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारा, दलित आणि मागासलेल्या लोकांना बळ देणारा, तरुणांना असंख्य नवीन संधी उपलब्ध करून देणारा, असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे शिक्षण आणि कौशल्ये नवीन उंची गाठतील. या अर्थसंकल्पामुळे छोटे व्यापारी आणि एमएसएमईंना प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. महिलांचा आर्थिक सहभाग सुनिश्चित होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली. 

आर्थिक विकासाला नवी गती मिळेलपंतप्रधान पुढे म्हणाले, बजेटमध्ये उत्पादन आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे, त्यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल. देशातील गरिबी दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष काळजी घेण्यात आली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना करात सूट देण्यात आली आहे. टीडीएसचे नियम सोपे करण्यात आले आहेत. पूर्व भारताच्या विकासात भर पडली आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा अभूतपूर्व विस्तार हे आमच्या सरकारचे वैशिष्ट्य आहे. आजचा अर्थसंकल्प याला आणखी बळ देणारा आहे. आजचा अर्थसंकल्प नव्या संधी आणि नवी ऊर्जा घेऊन आला आहे. यामुळे अनेक नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 

भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवूणार

या अर्थसंकल्पात सरकारने रोजगार संबंधित प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे देशात करोडो नवीन रोजगार निर्माण होतील. यासोबत आमचे सरकार आयुष्यातील पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना पहिला पगारही देणार आहे. उच्च शिक्षणासाठी मदत असो किंवा 1 कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप योजना असो, ग्रामीण आणि गरीब तरुण देशातील शीर्ष कंपन्यांमध्ये काम करतील. प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात उद्योजक बनवण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. आम्ही भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवू, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

गरिबांसाठी 3 कोटी नवीन घरे बांधण्याचा निर्णय

या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांवर सर्वाधिक फोकस आहे. धान्य साठवणुकीसाठी जगातील सर्वात मोठ्या योजनेनंतर आता आम्ही भाजीपाला उत्पादन क्लस्टर्स तयार करणार आहोत. यामुळे लहान शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे आणि इतर उत्पादनांना नवीन बाजारपेठ मिळून त्यांना चांगला भाव मिळेल. देशातील गरिबी संपुष्टात आणणे आणि गरिबांचे सक्षमीकरण करण्याच्या दिशेने आजच्या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गरिबांसाठी 3 कोटी नवीन घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी उन्नत ग्राम अभियान 5 कोटी आदिवासी कुटुंबांना मूलभूत सुविधांशी जोडेल, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :नरेंद्र मोदीकेंद्रीय अर्थसंकल्प 2019निर्मला सीतारामनकेंद्र सरकार