NCC Share Price: सिव्हिल कंन्स्ट्रक्शन उद्योगाशी संबंधित एनसीसी लिमिटेड या कंपनीचे शेअर्स कोसळले. एनसीसी लिमिटेडच्या शेअरनं शुक्रवारी ११ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांनी घसरून २०२.८५ रुपयांवर आला. कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. एनसीसी लिमिटेडच्या व्यवस्थापनानं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये महसूल आणि मार्जिन गाइडन्समध्ये कपात केली आहे, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपनीचे शेअर्स मार्च २०२४ नंतरच्या नीचांकी पातळीवर आहेत.
NCC चा नफा १३ टक्क्यांनी घसरला
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एनसीसी लिमिटेडचा करोत्तर नफा १३ टक्क्यांनी घसरून १८५.४ कोटी रुपये झाला आहे. तर कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर १.६ टक्क्यांनी घसरून ४,६७१ कोटी रुपयांवर आला. डिसेंबर 2024 तिमाहीत एनसीसी लिमिटेडचा एबिटडा १४.६ टक्क्यांनी घसरून ४०९.५० कोटी रुपयांवर आला. कंपनीचं मार्जिन वार्षिक आधारावर १३० बेसिस पॉईंटनं घसरून ८.८ टक्क्यांवर आलं. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीची ऑर्डर बुक ५१,८३४ कोटी रुपये होती.
शेअर्समध्ये मोठी घसरण
एनसीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत ३५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ७ ऑगस्ट २०२४ रोजी एनसीसीचा शेअर ३१९.३५ रुपयांवर होता. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर २०२.८५ रुपयांवर पोहोचला. गेल्या महिन्याभरात एनसीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये २५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
७ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर २७२.४० रुपयांवर होता. एनसीसी लिमिटेडचा शेअर ७ फेब्रुवारी २०२५ रोजी २०२.८५ रुपयांवर व्यवहार करत होता. एनसीसी लिमिटेडच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३६४.५० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २००.९५ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)