Nifty at 24,000: देशांतर्गत शेअर बाजार विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. गुरुवारी (२७ जून) शेअर बाजारानं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला. निफ्टीनं आज पुन्हा इतिहास रचला असून पहिल्यांदाच २४ हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टीनं गाठलेली ही ऐतिहासिक पातळी खास आहे. निफ्टीनं १,००० अंकांचं हे अंतर अतिशय कमी वेळात पार केलंय. म्हणजेच २३,००० ते २४,००० पर्यंत पोहोचण्यास फारच कमी वेळ लागला.
निफ्टीने अवघ्या ३४ दिवसात २३,००० ते २४,००० पर्यंत पातळी गाठली. २३००० ते २४००० अंकांचा प्रवास करण्यासाठी निफ्टीला केवळ २३ ट्रेडिंग सेशन्स लागले. निफ्टीनं २४ मे २०२४ रोजी पहिल्यांदा २३ हजार अंकांची पातळी पार केली. निवडणुकांच्या निकालानंतर निफ्टीमध्ये जवळपास ९.७ टक्क्यांची वाढ झालीये.
१००० अंकांचा प्रवास
मुव्हमेंट दिवस
१९००० ते २०००० २२
१६००० ते १७००० २८
२३००० ते २४००० ३४
६००० ते ७००० ३५
१४००० ते १५००० ३६
काय आहे निफ्टीचं पुढचं टार्गेट?
निफ्टीचा १००० ते २४००० पर्यंतचा प्रवास खूप खास राहिला आहे. १००० ते २४,००० ची पातळी गाठण्यासाठी १०,२९३ दिवस म्हणजेच २८ वर्षे, २ महिने, ५ दिवस लागले. २२ एप्रिल १९९६ रोजी निफ्टी ५० निर्देशांक सुरू झाला. आयसीआयसीआय डायरेक्टनं आपल्या टेक्निकल रिपोर्टमध्ये वर्षाच्या अखेरीस निफ्टी २५,२०० आणि २०३० पर्यंत निफ्टी ५०००० पर्यंत पोहोचेल असं म्हटलंय. २२,२०० निफ्टीची मजबूत सपोर्ट लेव्हल असेल, असंही त्यांनी नमूद केलंय.
या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय , १९९९ पासू आतापर्यंत इलेक्शन लो लेव्हलपासून सरासरी २० टक्क्यांची रॅली दिसून आलीये. गेल्या ९ वर्षात अमेरिकेच्या बाजारपेठेत सरासरी ९ टक्के वाढ झाली आहे. २००८ वगळता अमेरिकेच्या निवडणुकीच्या वर्षात निफ्टीने २० टक्क्यांच्या वाढीसह आऊटपर्फोर्म केलंय. गेल्या दोन दशकांत निवडणुकीच्या वर्षाच्या उत्तरार्धात वर्षअखेरीस सरासरी २१ टक्के वाढ झाली आहे.