Sensex-Nifty at Record High: जगातील बहुतांश बाजारांतून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात खरेदीचा कल दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजाराचा बेंचमार्क सेन्सेक्सनं ८२ हजारांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीनं २५ हजारांचा टप्पा ओलांडला. गुरुवारी शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला. आयटी वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल दिसून येत आहे. एकंदरीत आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.६४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.६४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स कामकाजादरम्यान १९०.३० अंकांनी वधारून ८१,९३१.६४ वर आणि निफ्टी ५० ७४.८५ अंकांनी म्हणजे ०.३० टक्क्यांनी वधारून २५,०२६.०० वर होता. एका दिवसापूर्वी सेन्सेक्स ७२१०१.६९ वर आणि निफ्टी २१८३९.१० वर बंद झाला होता.
संपत्तीत १.६४ लाख कोटींची वाढ
एका दिवसापूर्वी म्हणजेच ३१ जुलै २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप ४,६२,३८,००८.३५ कोटी रुपये होतं. आज १ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,६४,०२,९८६.६२ कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १,६४,९७८.२७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे २२ शेअर ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २२ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. मारुती सुझुकी, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक आणि इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक घसरले. पॉवरग्रिड, जेएसडब्ल्यू, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय बँक, इंडसइंड बँक, टायटन, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल या कंपन्यांचेही शेअर्स वधारले.