बुधवारीही शेअर बाजारात तेजी कायम होती. निफ्टी पहिल्यांदाच 20,000 अंकांच्या वर बंद झाला. सेन्सेक्सही 245 अंकांच्या उसळीसह आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. स्मॉल कॅप शेअर्समध्ये बुधवारी सर्वाधिक खरेदी दिसून आली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये टेलिकॉम, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल, मेटल, तसंच ऑईल आणि गॅस शेअर्सचे निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, आयटी, ऑटो आणि कॅपिटल गुड्सच्या समभागांमध्ये विक्री दिसून आली.
कामकाजाच्या अखेरिस, 30 शेअर्सचा बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 245.86 अंकांनी किंवा 0.37 टक्क्यांनी वाढून 67,466.99 वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 76.80 अंक किंवा 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 20,070.00 च्या पातळीवर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले 1.57 लाख कोटी
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल आज 13 सप्टेंबर रोजी 320.23 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलं. मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 12 सप्टेंबर रोजी ते 318.66 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसई मधील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
हे शेअर्स वधारले
सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.72 टक्क्यांची वाढ झाली. टायटन, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्सही वाढीसह बंद झाले.
यामध्ये घसरण
महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 1.35 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 0.53 टक्क्यांपासून ते 1.08 टक्क्यांची घसरण दिसून आली.