मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज काही प्रमाणात नफा वसूलीपासूनच सुरू झालं होतं. मात्र निफ्टी आणि सेन्सेक्सने शेवटच्या उच्चांकी पातळीचा आधार घेतला आणि दिवसभर बाजार रेंज बाऊंड राहिला. दरम्यान, बहुतेक निफ्टी साईडवेजच राहिला. मात्र, बाजारात शेअर स्पेसिफिक अॅक्टिव्हिटी दिसून आली.
कामकाजाच्या अखेरीस निफ्टी १८ अंकांच्या घसरणीनंतर २४१२४ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ३५ अंकांनी घसरून ७९४४१ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीनं आज २४२३६ ते २४०५६ च्या रेंजमध्ये व्यवहार केला.
टॉप गेनर्स कोण?
आयटी क्षेत्रातील शेअर्स आज सलग दुसऱ्या दिवशी खरेदीदारांसाठी चर्चेचा विषय राहिले आणि इन्फोसिस, विप्रो जवळपास दोन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. टीसीएसच्या शेअरमध्ये एक टक्का वाढ झाली. तर दुसरीकडे एचसीएलमध्येही तेजी दिसून आली. पण या क्षेत्राव्यतिरिक्त निफ्टी ५० निर्देशांकातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर एल अँड टी २.८७ टक्क्यांच्या वाढीसह निफ्टी ५० मध्ये सर्वाधिक वधारला.
बँकिंग क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग दिसून आलं. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे शेअर्स मात्र दिवसभर चांगल्या तेजीसह व्यवहार करत होते आणि दिवसअखेरीस १.५० टक्क्यांच्या वाढीसह ते बंद झाले. इतर बँकिंग शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून आली. निफ्टीतील सर्वाधिक घसरणीत श्रीराम फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक ३.३५ टक्क्यांनी घसरले, तर भारती एअरटेलचे शेअर्स २.३९ टक्क्यांनी घसरले. टाटा मोटर्स, कोटक बँक, बजाज फायनान्समध्ये २-२ टक्क्यांची घसरण झाली.