Zerodha Nithin Kamath: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. यात गुंतवणूकदारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या घसरणीचा परिणाम ब्रोकिंग उद्योगावर स्पष्टपणे दिसून येतोय. शेअर ट्रेडिंग आणि ब्रोकिंग प्लॅटफॉर्म झिरोदाचे सीईओ नितीन कामत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ट्रेडिंग अॅक्टिव्हिटीजमध्ये मोठी घसरण अधोरेखित केली आहे. त्याचबरोबर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या वसुलीचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
काय म्हणाले नितीन कामथ?
'शेअर बाजारात अखेर करेक्शन दिसून येत आहे. जसा बाजार शिखरावर पोहोचला होता, तसा बाजार तसा तो आणखी खाली येऊ शकतो. इथून मार्केट कुठे जाईल माहीत नाही, पण ब्रोकिंग इंडस्ट्रीबद्दल सांगू शकतो. ट्रेडर्सची संख्या आणि प्रमाण या दोन्ही बाबतीत मोठी घसरण होत आहे," असं नितीन कामथ म्हणाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे त्यांनी यासंदर्भातील वक्तव्य केलंय.
बाजारात अजूनही अनिश्चितता
नितीन कामथ यांनीही आपल्या पोस्टमध्ये दोन चार्टचा समावेश केला आहे. "हा ट्रेडिंग व्हॉल्यूम चार्ट आहे. ब्रोकर्सच्या कामामध्ये ३० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. आम्ही १५ वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही पहिल्यांदाच ट्रू-टू-मार्केट सर्क्युलरद्वारे व्यवसायात घट पाहात आहोत", असं ते म्हणाले.
हे असंच चालू राहिलं तर आर्थिक वर्ष २५-२६ मध्ये एसटीटी (सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स) मधून सरकारला ४० हजार कोटी रुपयेही मिळू शकणार नाहीत, असंही कामत म्हणाले. ८० हजार कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा हे प्रमाण किमान ५० टक्क्यांनी कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
फेब्रुवारीत चार हजार अंकांची घसरण
फेब्रुवारी महिना भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत वाईट ठरला. फेब्रुवारीमध्ये सेन्सेक्स ४,००० अंकांनी घसरला आणि संपूर्ण महिन्यात ५% ची घसरण झाली. १९९६ मध्ये लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच निफ्टी सलग पाच महिने घसरलाय.