Lokmat Money >शेअर बाजार > नितीन गडकरींचे डिझेल वाहनांबाबत एक वक्तव्य अन् Tata-Mahindra चे हजारो कोटी स्वाहा...

नितीन गडकरींचे डिझेल वाहनांबाबत एक वक्तव्य अन् Tata-Mahindra चे हजारो कोटी स्वाहा...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:10 PM2023-09-12T20:10:33+5:302023-09-12T20:13:58+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला.

Nitin Gadkari statement on diesel vehicles and thousands of crores of Tata-Mahindra gone | नितीन गडकरींचे डिझेल वाहनांबाबत एक वक्तव्य अन् Tata-Mahindra चे हजारो कोटी स्वाहा...

नितीन गडकरींचे डिझेल वाहनांबाबत एक वक्तव्य अन् Tata-Mahindra चे हजारो कोटी स्वाहा...

Tata-Mahindra: आज माध्यमांमध्ये एक बातमी व्हायरल झाली, ज्यामुळे देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्या टाटा आणि महिंद्राला मोठा फटका बसला. डिझेल इंजिन वाहनांवर 10 % अतिरिक्त GST लावण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये पसरल्यामुळे शेअर मार्केटमध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळाला. त्याचा फटका डिझेल वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर दिसून आला. 

मंगळवारी सियाम (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) च्या एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेल वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावण्याबाबत वक्तव्य केले, परंतु नंतर त्यांनी स्पष्ट केले की, सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. पण, त्यांच्या वक्तव्याचा परिणाम डिझेल कार, बस, ट्रक आणि ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपन्यांवर स्पष्टपणे दिसून आला. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

टाटा मोटर्सचे हजारो कोटी स्वाहा
देशातील सर्वात मोठ्या बस आणि ट्रक उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत आज 2.19 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. याचा थेट परिणाम कंपनीच्या बाजार भांडवलावर (MCAP) झाला. सोमवारी संध्याकाळी शेअर बाजार बंद होण्यापूर्वी कंपनीचा एमकॅप 2,10,838.56 कोटी रुपये होता, जो मंगळवारी शेअरच्या नीचांकी पातळीवर 2,04,493.81 कोटी रुपये आला. अशा प्रकारे कंपनीच्या गुंतवणूकदारांना 6,344.75 कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले आहे.

महिंद्रालाही मोठा फटका
ट्रक आणि ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या एमकॅपमध्येही आज सुमारे 8600 कोटी रुपयांची घसरण झाली. सोमवारी कंपनीचा एमकॅप 1,96,738.69 कोटी रुपये होता. मंगळवारी शेअरच्या किमतीची नीचांकी पातळी गाठल्यानंतर हा 1,88,145.91 कोटी रुपयांवर आला. अशाप्रकारे आज बाजारात कंपनीच्या गुंतवणूकदारांचे 8,592.78 कोटी रुपये बुडाले.

अशोक लेलँड-आयशर मोटर्सचीही अवस्था बिकट 
अशोक लेलँड आणि आयशर मोटर्स या देशातील बस, ट्रक आणि ट्रॅक्टर बनवणाऱ्या अन्य दोन कंपन्यांच्या शेअर्समध्येही मंगळवारी 1.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यांच्या मार्केट कॅपमध्येही कमालीची घसरण झाली आहे. सोमवारी अशोक लेलँडचा एमकॅप 54,259.63 कोटी रुपये होता, जो मंगळवारी 51,940.09 कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. आयशर मोटर्सचा एमकॅप सोमवारी 93,415.56 कोटी रुपये होता, जो मंगळवारी 91,105.18 कोटी रुपयांपर्यंत घसरला.

Web Title: Nitin Gadkari statement on diesel vehicles and thousands of crores of Tata-Mahindra gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.