Government Company M-Cap सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता सहा टप्प्यांतल्या निवडणुका पार पडल्या आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान येत्या शनिवारी होणार आहे. या निवडणुकीच्या हंगामात कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक परतावा दिला आहे हे तुम्हाला माहित आहे? अदानी किंवा अंबानी किंवा इन्फोसिस (Infosys) आणि टीसीएस (TCS) सारखे शेअर्स असतील असा विचार तुम्ही करत असाल. पण या हंगामात ज्या तीन कंपन्यांच्या शेअर्सनं शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे, त्या सर्व सरकारशी संबंधित आहेत.
यांचं मार्केट कॅप सर्वाधिक वाढलं
हिंदुस्थान झिंक लिमिटेड (HZL), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी या निवडणुकीच्या हंगामात रिलायन्स, अदानी एंटरप्रायझेस किंवा इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. एचएएल आणि एसबीआयचं व्यवस्थापन नियंत्रण पूर्णपणे सरकारच्या हातात आहे, हे तुम्हाला माहित असेलच. हिंदुस्थान झिंक लिमिटेड ही एकेकाळी सरकारी कंपनी होती. पण तत्कालिन अटलबिहारी वाजपेयी सरकारनं ती अनिल अग्रवाल यांच्या वेदांत समूहाला विकली. पण तरीही या कंपनीत भारत सरकारचा २९.५ टक्के हिस्सा आहे.
हिंदुस्थान झिंक लिमिटेडची स्थिती
बिझनेस टुडेनं कॉर्पोरेट डेटाबेस एसीइक्विटीकडून मिळवलेल्या डेटाचा हवाला देत एक बातमी दिली आहे. १९ एप्रिल ते गेल्या बुधवारपर्यंत हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या मार्केट कॅपमध्ये ७६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आता त्याच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे १.३ लाख कोटी रुपयांची भर पडली. आरआयएल, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल या बीएसईवरील पाच कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल याच कालावधीत ६०,९७२ कोटी रुपये वाढलं, असं त्यात म्हटलं आहे.
HAL मध्येही वाढ
निवडणुकीच्या हंगामात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) शेअर्स ३७ टक्क्यांनी वधारले. लढाऊ जेट, हेलिकॉप्टर्स, जेट इंजिन आदींच्या उत्पादकांनी या काळात आपल्या बाजारभांडवलात ९१,८६० कोटी रुपयांची भर घातली. अरिहंत कॅपिटलनं म्हटलं की, कंपनीच्या सध्याच्या ऑर्डर बुकमध्ये कंपनीच्या ऑपरेशन्सची संख्या एचएएलच्या मॅन्युफॅक्चरिंग लाइन्स २०३२ पर्यंत व्यस्त ठेवेल.
स्टेट बँकेलाही मोठा फायदा
निवडणुकीच्या काळात देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचा शेअर १०.५ टक्क्यांनी वधारला. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलात ६९,७४५.८४ कोटी रुपयांची भर पडली. ट्रेंडलाइननुसार, एसबीआयकडे २८ 'स्ट्राँग बाय' कॉल आहेत. मात्र, त्याची सरासरी टार्गेट प्राइस ८८५ रुपये आहे.
अन्य कंपन्यांची काय स्थिती?
भारती एअरटेल लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, सिमेन्स लिमिटेड आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांच्या बाजार भांडवलात ५० ते ६८ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, अॅक्सिस बँक लिमिटेड, एबीबी इंडिया लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, आरईसी लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, व्होडाफोन आयडिया लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड यांच्याही मार्केट कॅपमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)