Madhuri Dixit Swiggy Investment : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीच्या आयपीओबाबत बाजारात सध्या चर्चा सुरू आहेत. कंपनी आपला आयपीओ या वर्षी डिसेंबरपर्यंत बाजारात आणू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, स्विगीचा आयपीओ सुमारे ११,००० कोटी रुपयांचा असून आयपीओनंतर कंपनीचं मूल्यांकन १.२५ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या आयपीओच्या बातम्यांदरम्यान आता अभिनेत्री माधुरी दीक्षितचंही मन या कंपनीवर आलंय. आयपीओ येण्यापूर्वीच तिनं स्विगीवर मोठा डाव खेळलाय.
माधुरी दीक्षितनं स्विगीचे कोट्यवधी रुपयांचे शेअर्स खरेदी केल्याचं म्हटलं जातंय. यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन आणि मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चेअरमन रामदेव अग्रवाल यांनीही यात गुंतवणूक केली होती.
माधुरी दीक्षितची मोठी गुंतवणूक
मनीकंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार तिनं हे शेअर्स ३४५ रुपये प्रति शेअर दराने खरेदी केलेत. माधुरी दीक्षितनं सेकंडरी मार्केटमधून इनोव्ह ८ चे संस्थापक रितेश मलिक यांच्यासोबत मिळून हा व्यवहार केला आहे. माधुरी दीक्षित आणि रितेश मलिक यांनी जवळपास ३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केलेत. या दोघांनीही प्रत्येकी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.