Join us

आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:23 AM

Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पाहा काय होणार गुंतवणूकदारांना फायदा. महिला गुंतवणूकदारांनाही आहे विशेष सूट.

Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने (CDSL) नवीन समान दर लागू करण्याची घोषणा केली आहे. ही नवी प्रणाली १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आणखी एक विशेष बाब म्हणजे या नव्या टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये काही सवलतीही लागू असतील. सीडीएसएलनं प्रत्येक डेबिट व्यवहारासाठी ३.५० रुपये समान दर लागू केला आहे. नवे दर शेअर्सशी संबंधित सर्व डेबिट व्यवहारांना लागू होतील. यापूर्वी सीडीएसएल प्रत्येक डेबिट व्यवहारासाठी ३.७५ ते ५.५ रुपये आकारत होती.

दरम्यान, सीडीएसएल काही सवलती देत राहील आणि महिला डीमॅट खातेधारकांनी (सोलो किंवा फर्स्ट होल्डर म्हणून) केलेल्या डेबिट व्यवहारांवर ०.२५ रुपये आणि म्युच्युअल फंड, बाँड ISIN (International Securities Identification Numbers) मधील व्यवहारांसाठी ०.२५ रुपयांची सूट आहे. सीडीएसएल भारतीय इक्विटी मार्केटमध्ये डिपॉझिटरी सेवा पुरवते. ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सिक्युरिटीज ठेवण्याची आणि हस्तांतरित करण्याची सुविधा देते.

ट्रेडिंगची सुविधा

सीडीएसएल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स, बॉन्ड आणि म्युच्युअल फंड यासारख्या सिक्युरिटीजचे होल्डिंग आणि ट्रेडिंगची सुविधा देते. सीडीएसएलनं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घोषणा सेबीच्या 'ट्रू टू लेबल' परिपत्रकाच्या अनुषंगाने आहे आणि गुंतवणूकदारांसाठी व्यवहार खर्च सुलभ करणे हे त्यामागील उद्दीष्ट असल्याचं म्हटलंय.

सीडीएसएलसारख्या डिपॉझिटरीकडून होणारा व्यवहार खर्च म्हणजे डीमॅट खात्यातून शेअर्स विकताना आकारलं जाणारं शुल्क आहे. सीडीएसएल ही आशियातील एकमेव लिस्टेड डिपॉझिटरी सेवा असून तिचं मार्केट कॅप सुमारे ३१,३०० कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात तिच्या शेअरच्या किंमतीत १२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्डेट असलेल्या सीडीएसएलमध्ये १३ कोटींहून अधिक गुंतवणूकदार आहेत.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक