येत्या काही दिवसांमध्ये अनेक कंपन्या आपले आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. यातच एक स्मॉल फायनान्स बँकही आपला आयपीओ आणणार आहे. आता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ येणार आहे. येत्या १२ जुलै रोजी म्हणजेच बुधवारी त्याचा आयपीओ खुला होईल. तर यासाठी १४ जुलैपर्यंत तुम्हाला बोली लावता येईल. या IPO चा प्राइस बँड २३ ते २५ रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलाय. यामध्ये अँकर गुंतवणूकदार ११ जुलै रोजी बोली लावू शकतील.
बाजार नियामक सेबीकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO हा 500 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा पूर्णपणे फ्रेस इश्यू आहे. या IPO अंतर्गत, 10 रुपयांच्या शेअरची किंमत 23 ते 25 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या रकमेचा वापर बँक भाडवलाच्या आधारे टियर 1 मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी करणार आहे. मार्च 2023 पर्यंत याचे टियर-1 भांडवल आधार 1,844.82 कोटी रुपये किंवा 18.25 टक्के होता.
किती शेअर्ससाठी करावा लागेल अर्ज
या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना किमान 600 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. अधिक शेअर्ससाठी बोली लावणाऱ्यांना 600 शेअर्सच्या पटीत अर्ज करावा लागेल. ICICI सिक्युरिटीज लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड या सार्वजनिक इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर इश्यूचे रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड आहेत.
उत्कर्ष कोरल इन्व्हेस्ट लिमिटेड हे बँकेची एकमेव प्रमोटर आहे. याला पूर्वी उत्कर्ष मायक्रो फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखलं जात होतं.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)