Adani Group Share Market: हिंडेनबर्ग संस्थेने जारी केलेल्या अहवालानंतर झालेल्या प्रचंड नुकसानीतून अदानी समूह हळूहळू सावरताना दिसत आहे. अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर पुन्हा एकदा तेजीत आल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE ने अदानी समूहातील ३ कंपन्यांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अदानी समूहासाठी दिलासादायक मानला जात असून, यामुळे या तीन कंपन्याचे शेअर्स रॉकेट स्पीड पकडून चांगला व्यवहार करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स प्रचंड प्रमाणात घसरले. याची दखल घेत NSE ने अदानी एंटरप्राइसेस (Adani Enterprises), अदानी पोर्ट (Adani Port) आणि अबुंजा सीमेंट (Ambuja Cement) या तीन कंपन्यांना अॅडिशनल सर्व्हिलन्समध्ये टाकले होते. यामध्ये बाजार नियामक सेबी आणि मार्केट एक्सचेंज BSE, NSE यावर देखरेख ठेवतात. याचा उद्देश गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा असतो. जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात, तेव्हा त्या कंपनीच्या शेअरवर देखरेख ठेवण्याचे काम सेबी आणि BSE व NSE करतात.
सुमारे १ महिना अदानी समूहाच्या कंपनींवर देखरेख
जानेवारी महिन्यात हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याचा मोठा परिणाम अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून आला. यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला अदानी समूहाच्या ३ कंपन्यांच्या शेअर्सवर देखरेख वाढवण्यात आली. ६ फेब्रुवारीपासून ही देखरेख सुरु होती. अदानी पोर्ट आणि अंबुजा सिमेंट आधीच या कक्षेबाहेर आहेत. अदानी एंटरप्रायसेसबाबत ६ मार्च रोजी निर्णय देण्यात येणार आहे. अदानी एंटरप्रायसेसच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री पाहता त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम सुरू झाले.जेव्हा NSE ने अदानी एंटरप्रायसेसला शॉर्ट टर्म अॅडिशनल सर्व्हिलन्सच्या फ्रेमवर्कमध्ये ठेवले तेव्हा त्याचा परिणाम शेअर्सवरही झाला. त्यात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, एका रिपोर्टनुसार, NSE च्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सुमारे एक महिन्यानंतर अदानी एंटरप्रायसेसचा स्टॉक बुधवारपासून फ्रेमवर्कच्या बाहेर जाईल. त्यानंतर या शेअर्सवर त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांत अदानीच्या इतर शेअर्सप्रमाणे या शेअरमध्येही जोरदार उसळी पाहायला मिळू शकते. गेल्या पाच दिवसांत याच चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. आताच्या घडीला अदानी एंटरप्रायसेसचा समभाग ५.४५ टक्क्यांच्या उसळीसह १,९८२.०० रुपयांवर व्यवहार करत आहे.
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"