NTPC Green Energy IPO: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनटीपीसीची रिन्यूएबल एनर्जी युनिट एनटीपीसी ग्रीन एनर्जी लवकरच आयपीओसाठी अर्ज करणार आहे. एनटीपीसी व्यवस्थापन एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या लिस्टिंगसाठी तयारी करत आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ नं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील माहिती दिलीये. कंपनीच्या व्यवस्थापनानं यापूर्वीच, ते कॅलेंडर वर्ष २०२४ च्या अखेरीस रिन्यूएबल एनर्जी व्यवसायाचं लिस्टिंग करण्याची योजना आखत असल्याचं म्हटलं होतं. सूत्रांनी सीएनबीसी-टीव्ही १८ ला सांगितले की,
"आयपीओवर विचार करण्याचं मुख्य कारण व्यवसायात इक्विटीची महत्त्वाची गरज आहे. आम्हाला अंतर्गत स्त्रोतांकडून बाजारातून इक्विटी उभी करावी लागेल. त्यामुळे एक अशी वेळ येईल जेव्हा आम्हाला बाजारात यावंच लागेल असं वाटतंय," असं सीएनबीसी टीव्ही १८ ला यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत एनटीपीसी ग्रीन एनर्जीचे सीईओ मोहित भार्गव म्हणाले होते.
एनटीपीसीचा प्लान काय?
वीज निर्मिती कंपनीने २०२४ मध्ये रिन्यूएबल एनर्जीवर सुमारे १०,००० कोटी रुपये आणि २०२५ मध्ये सुमारे १५,००० ते २०,००० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची (कॅपेक्स) योजना आखली आहे. एखादी कंपनी साधारणपणे २० ते २५ टक्के इक्विटी म्हणून गुंतवणूक करते, असं भार्गव म्हणाले.