Join us  

पैसे तयार ठेवा! Ola Electric च्या IPO ला अखेर मंजुरी, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 3:38 PM

ओला इलेक्ट्रिकला इनिशियल पब्लिक ऑफरिंग लाँच करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे.

Ola Electric IPO: देशातील अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिकचा इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच आयपीओबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ओला इलेक्ट्रिकला आयपीओ लाँच करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून अखेर मंजुरी मिळाली आहे. ओला ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक बाईक उत्पादक कंपनी आहे. बेंगळुरूस्थित या कंपनीने २२ डिसेंबर २०२३ रोजी सेबीकडे आयपीओसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दिला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी  या आयपीओला मंजुरी मिळाली आहे.

ओला इलेक्ट्रिक टीव्हीएस मोटर्स आणि बजाज ऑटो सारख्या दिग्गज तसेच एथर एनर्जी सारख्या स्टार्टअप्ससोबत स्पर्धा करत आहे. स्विगी आणि फर्स्टक्रायसह इतर आघाडीच्या नवीन-युगातील स्टार्टअप्सनीही त्यांचे ड्राफ्ट आयपीओ दस्तऐवज सेबीकडे दाखल केले आहेत. मात्र आता ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओला सेबीने मंजुरी दिली आहे.

ओला इलेक्ट्रिकने ऑफर फॉर सेलद्वारे ९.५२ कोटींचे शेअर्स विकण्याचा आणि नवीन शेअर्स जारी करून ५,५०० कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कंपनीचे संस्थापक भावेश अग्रवाल एकटे ४.७३ कोटी शेअर्स विकणार आहेत  जे एकूण जे ओएफएसच्या ५० टक्के आहेत. दुसरीकडे सेबीने Emcure Pharmaceuticals ला आयपीओ लाँच करण्यास मान्यता दिली आहे. मॅक्योर फार्मास्युटिकल्स ८०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करेल आणि कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार ओएफएसद्वारे १.३६ कोटी इक्विटी शेअर्स विकतील.

ओला इलेक्ट्रिकने प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे १००० कोटी उभारण्याचा पर्याय वापरला आहे. कंपनी या आयपीओमधून उभारलेला निधी भांडवली खर्च, उपकंपनीचे कर्ज भरणे, संशोधन आणि उत्पादन विकासात गुंतवणूक आणि नवीन स्रोतांमधून उत्पन्न मिळवण्यासाठी वापरेल. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा महसूल एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सात पटीने वाढून ६३०.९३ कोटी रुपये झाला आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाशेअर बाजारसेबीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार