Join us  

Ola Electric share: ₹१६० पर्यंत जाऊ शकतो 'या' इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 3:17 PM

Ola Electric share : लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली होती. परंतु नंतर त्यात घसरण झाली. परंतु आता पुन्हा एकदा त्यात तेजी दिसून आली आहे

Ola Electric share: काही दिवसांपूर्वी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी ही कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली होती. परंतु नंतर त्यात घसरण झाली. परंतु आता पुन्हा एकदा त्यात तेजी दिसून आली आहे. ब्रोकरेज फर्म बोफा सिक्युरिटीज आणि गोल्डमन सॅक्स यांनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडवर 'बाय' रेटिंगसह कव्हरेज सुरू केलं आहे. 

बोफा सिक्युरिटीजने १४५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह कव्हरेज सुरू केलं. म्हणजेच सोमवारच्या १०७.६५ रुपयांच्या बंद दराच्या तुलनेत त्यात ३५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. दुसरीकडे गोल्डमन सॅक्सनेही कव्हरेज सुरू केलं असून ब्रोकरेज फर्मनं या शेअरवर १६० रुपयांच्या टार्गेट प्राइससह बाय रेटिंग दिलं आहे. सोमवारच्या बंद किमतीपेक्षा हा दर जवळपास ५० टक्क्यांनी अधिक आहे. कामकाजादरम्यान, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर मंगळवारी ८ टक्क्यांनी वधारून ११६.४० रुपयांवर पोहोचला होता.

विक्रमी पातळीवरुन घसरला

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर सध्या १५७ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून ३० टक्क्यांहून अधिक खाली आला आहे. एचएसबीसी ही ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीवर १४० रुपयांच्या टार्गेट प्राइससह कव्हरेज सुरू करणारी पहिली ब्रोकरेज कंपनी होती. बोफा सिक्युरिटीजनं आपल्या नोटमध्ये, भारतीय दुचाकींमध्ये इलेक्ट्रिक वाहन स्वीकारण्याचं प्रमाण सध्या ६.५% आहे, परंतु ई-स्कूटरची किंमत आता पेट्रोल स्कूटरपेक्षा कमी आहे, जे ईव्ही कर्व्हवर बदल दाखवत असल्याचं त्यांनी आपल्या नोटमध्ये म्हटलंय.

ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की टू-व्हीलर सेगमेंटमधील इलेक्ट्रिक वाहनं आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत १८% आणि आर्थिक वर्ष २०३० पर्यंत २५ टक्क्यांपर्यंत पोहोचतील. भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिक दीर्घ कालावधीच्या दृष्टीनं सकारात्मक आहे, असा गोल्डमन सॅक्सचा विश्वास आहे. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

 

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारओला