Ola Share Price : गेल्या काही दिवसांत ओला इलेक्ट्रिक कंपनीने सातत्याने चर्चेत आहे. आपल्या खराब सर्विसमुळे कंपनीला सातत्याने टीकेला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम ओलाच्या शेअर्सवरही झाला होता. शेअर्स दिवसेंदिवस घसरत चालले होते. मात्र, यावर आता ओलाने काम करण्यास सुरुवात केली आहे. ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल आज खूप आनंदी असतील. कारण, एका निर्णयामुळे त्यांच्या कंपनीचे शेअर्स रॉकेट झाले आहेत. दुपारी २:०५ वाजता शेअर्स २० टक्के अपर सर्किट लागलं आहे.
बुधवारी दुपारी २:०५ वाजता ओला इलेक्ट्रिकचे शेअर २० टक्क्यांनी वाढून ८८.१६ रुपयांवर गेले होते. या वाढीमुळे त्याची किंमत पुन्हा इश्यू किमतीपेक्षा जास्त झाली आहे. त्याची इश्यू किंमत ७६ रुपये होती. गेल्या २ दिवसांत ओलाच्या शेअर्समध्ये २६% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
ओला कंपनीच्या कोणत्या निर्णयाचा झाला फायदा?
कंपनीने काल म्हणजेच मंगळवारी इलेक्ट्रिक स्कूटरच्या २ नवीन रेंज लाँच करण्याची घोषणा केली होती. यामध्ये Ola Gig आणि Ola S1 Z यांचा समावेश आहे. या मॉडेलची सुरुवातीची किंमत ३९,९९९ रुपये आहे. ओलाच्या आजपर्यंतच्या या सर्वात स्वस्त स्कूटर आहेत. या स्कूटरची डिलिव्हरी एप्रिल २०२५ पासून सुरू होईल. यापैकी, गिग श्रेणी ही ऑनलाइन वस्तू वितरित करणाऱ्या कामगारांसाठी आहे.
कंपनीच्या या घोषणेचा शेअर्सवर सकारात्मक परिणाम झाला आहे. मंगळवारी शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वाढले होते. ही वाढ आज म्हणजेच बुधवारीही कायम राहिली. स्कूटरबाबत ग्राहकांकडून सातत्याने तक्रारी येत असताना कंपनीने ही घोषणा केली आहे.
अनेक दिवसांनी ओलाच्या शेअर्समध्ये वाढ
ओलाचा IPO यावर्षी ९ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला होता. त्याची लिस्टिंग फारशी चांगली नव्हती. ती इश्यू किमतीच्या आसपास म्हणजेच ७६ रुपयांच्या आसपास लिस्टेड होती. मात्र, यानंतर या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली होती. काही दिवसांतच तो १५७.५३ रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, त्यानंतर त्यात सातत्याने घट होत होती. मात्र, आता गेल्या २ दिवसांपासून त्यात झपाट्याने वाढ होत आहे. या २ दिवसांत त्याचा स्टॉक आतापर्यंत २६ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
ओला कायम चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून ओला स्कूटरबाबत अनेक वादविवाद पाहायला मिळाले. बहुतांश वाद हे खराब सेवेवरून आहेत. अनेक ग्राहकांनी स्कूटर ओलाच्या शोरुम समोरच पेटवून दिली होती. तर दोन दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एकजण हातोड्याने स्कूटर फोडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.