Ola Electric Share Price : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये आज २९ ऑक्टोबर रोजी ३.६६ टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली आणि कामकाजादरम्यान तो घसरुन ७५.५५ रुपयांवर आला होता. हा शेअर कामकाजादरम्यान आयपीओच्या ७६ रुपयांच्या खाली गेला. आजच्या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप ३३४६० कोटी रुपयांवर आलं आहे. २० ऑगस्ट २०२४ रोजी या शेअरने १५७.५३ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. ही उच्चांकी पातळीवरून ५२ टक्क्यांपर्यंतची घसरला आहे. दरम्यान यानंतर कामकाजाच्या अखेरिस हा शेअर ७६.६४ रुपयांवर आला.
फ्लॅट लिस्टिंगनंतर जोरदार तेजी
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरनं आज इंट्राडे नीचांकी स्तर ७४.८४ रुपयांवर पोहोचला होता. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरनं ९ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात एन्ट्री घेतली होती. कंपनीचा शेअर बीएसईवर ७५.९९ रुपये आणि एनएसईवर ७६ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगच्या काही दिवसातच ओला इलेक्ट्रिकनं १५७.५३ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. पण आता तो उच्चांकी पातळीवरून ५० टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
सेवेवरुन कंपनीवर टीका
दरम्यान, ओला इलेक्ट्रिकला निकृष्ट सेवेमुळे मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (सीसीपीए) ७ ऑक्टोबर रोजी ओला इलेक्ट्रिक विरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि कंपनीला उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. मात्र, ग्राहकांच्या ९९ टक्के तक्रारींचं निराकरण झाल्याचा दावा कंपनीनं केला.
या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ओलाचा मार्केट शेअर १६ महिन्यांतील नीचांकी म्हणजे २७ टक्क्यांवर घसरला आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात आपला मार्केट शेअर पुन्हा ३० टक्क्यांच्या वर गेल्याची माहिती दिली त्यांनी होती.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)