Stock Market Open: शेअर बाजारातील कामकाज गुरुवारी बंपर तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 540 अंकांच्या वाढीसह 72650 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टी 171 अंकांच्या वाढीसह 22010 अंकांच्या पातळीवर उघडला. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हनं देशाला सकारात्मक नोट दिल्यानंतर भारतातील शेअर बाजार उच्चांकी पातळीवर उघडले. अमेरिकन शेअर बाजारातील चांगल्या वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातील वातावरणही सकारात्मक झालं.
अमेरिकेच्या सेंट्रल बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केलेला नसून महागाईचा दर आटोक्यात राहिल्यास यावर्षी व्याजदरात कपात होऊ शकते, अशी आशा व्यक्त केली आहे. निफ्टीचं इमिडिएट टार्गेट 22000 आणि 22527 ची लेव्हल असल्याचं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार SBI च्या इलेक्टोरल बाँड्सचे तपशील जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात चढ-उतार नोंदवले जाऊ शकतात.
गुरुवारी सकाळी निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकांनी चांगली तेजी दिसून आली होती.
शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये टाटा स्टील, बीपीसीएल, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, इंडसइंड बँक, कोल इंडिया लिमिटेड आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. तर नेस्ले इंडिया, डॉ. रेड्डीज, ब्रिटानिया, हीरो मोटोकॉर्प, अपोलो हॉस्पिटल, मारुती सुझुकी आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.