Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज शुक्रवारी घसरणीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 234 अंकांनी घसरला आणि 74803 अंकांच्या पातळीवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 80 अंकांनी घसरला आणि 22674 अंकांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर त्यात थोडी रिकव्हरी दिसून आली. अमेरिकेतील महागाईच्या आकड्यांचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये वाढ होत होती. तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण झाली.
टॉप गेनर्स आणि लूजर्स कोण?
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये एनटीपीसी, टाटा मोटर्स, लार्सन, हिंडाल्को, इंडसइंड बँक, महिंद्रा आणि दिवीज लॅबचे शेअर्स होते. तर सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, बीपीसीएल. अपोलो हॉस्पिटल, एशियन पेंट्स, सिप्ला आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
अमेरिकेतील महागाईचे आकडे
अमेरिकेत महागाईची आकडेवारी आल्यानंतर सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हची व्याजदर कपातीची योजना पुढे जाऊ शकते. त्यामुळे शेअर बाजारात कमजोरी नोंदवली जात आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी विदेशी गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्यानं खरेदी करत असल्याने देशातील शेअर बाजारात तेजी येऊ शकते, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
83 हजार कोटी बुडाले
एका ट्रेडिंग दिवसाआधी म्हणजेच 10 एप्रिल 2024 रोजी, बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप 4,02,19,353.07 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 12 एप्रिल 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,01,35,389.47 कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 83,963.6 कोटी रुपयांची घट झाली आहे.