Stock Market Opening Bell: आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 477 अंकांनी वधारून 73565 अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 123 अंकांनी वधारून 22270 अंकांच्या पातळीवर आले. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते.
शेअर बाजारातील सर्वाधिक तेजी असलेल्या शेअर्सच्या यादीत बीपीसीएल, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन, बजाज फायनान्स, डिविज लॅब आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सचा समावेश होता. तर टॉप लूजर्समध्ये जीएसपीएल, रामकृष्ण फोर्जिंग, सन फार्मा, व्होडाफोन आयडिया, मदरसन सुमी, पर्सिस्टंट सिस्टीम आणि ई-क्लर्क सर्व्हिसेसच्या शेअर्सचा समावेश होता.
मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती काय?
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं तर, यामध्ये ओएनजीसीसह कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, विप्रो, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोसिस आणि टीसीएस यांच्या समभागांचा समावेश आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली. सोमवारी गौतम अदानी समूहाच्या सर्व १० कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
चालू आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर बाजारातील कामकाज तेजीसह सुरू होईल अशी अपेक्षा होती. शेअर बाजारातील कामकाज सकारात्मक सुरू होऊ शकेल, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते.