Opening Bell Today: शेअर बाजारातील कामकाज बुधवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 180 अंकांच्या वाढीसह 72211 अंकांच्या पातळीवर तर, निफ्टी 47 अंकांच्या वाढीसह 21864 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेससह सर्व निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते.
जर आपण शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ होत असलेल्या कंपन्यांबद्दल बोललो तर यामध्ये आयशर मोटर्स, बीपीसीएल, मारुती सुझुकी, एनटीपीसी, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. तर ग्रासिम इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाईफ, ब्रिटानिया, एचयुएल, डॉ. रेड्डी, टायटन आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
बुधवारी प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 25 अंकांच्या वाढीसह 72036 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 26 अंकांच्या वाढीसह 21844 अंकांच्या पातळीवर काम करत होता. शेअर बाजारातील कामकाज सकारात्मकतेनं सुरू होऊ शकेल, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. आशियाई शेअर बाजारातही संमिश्र कल दिसून आला.
जियो पॉलिटिकल टेन्शन आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह यामुळे मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी आणि वॉल स्ट्रीटची चांगली कामगिरी यामुळे बुधवारी सकाळी शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडला. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निफ्टी छोट्या कालावधीत तेजीत राहण्याची अपेक्षा आहे, तो छोट्या कालावधीत 22050 ची पातळी गाठू शकतो.