Stock Market Open: मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 177 अंकांच्या वाढीसह 72964 अंकांवर तर निफ्टी 63 अंकांच्या वाढीसह 22167 अंकांवर उघडला. मंगळवारच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी ऑटो निर्देशांकासह सर्वच निर्देशांकांमध्ये किंचित वाढ नोंदविली जात होती. मात्र नंतर त्यात थोडी घसरण दिसून आली.
श्रीराम फायनान्स, हिंडाल्को, बीपीसीएल, ओएनजीसी, कोल इंडिया, पॉवर ग्रिड आणि एचडीएफसी लाइफ या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर सिप्ला, बजाज ऑटो, टाटा कन्झ्युमर, डिव्हिस लॅब, अपोलो हॉस्पिटल्स, एशियन पेंट्स आणि ब्रिटानिया या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
प्री ओपन मार्केटची स्थिती
मंगळवारी प्री ओपन व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ८० अंकांच्या घसरणीसह ७२६९७ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी २२ हजार ११३ अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचे कामकाज तेजीने सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. मंगळवारी आशियाई शेअर बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. बाजारातील अस्थिर व्यवहारानंतर सोमवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएससी निफ्टीमध्ये तेजी दिसली होती.
महागाईतून दिलासा
भारताचा कन्झ्युमर प्राईज इंडेक्स इन्फ्लेशन ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानं रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल, अशी आशा निर्माण झाली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत. विश्लेषणानुसार शेअर बाजारात तेजीचा हॅमर कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे.