Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 200 अंकांच्या वाढीसह 74944 च्या पातळीवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 62 अंकांच्या वाढीसह 22728 च्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वगळता, सर्व निर्देशांक सर्व ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. कामकाजादरम्यान सेन्सेक्सनंं पहिल्यांदा 75000 अंकांचा विक्रमी उच्चांक गाठला.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डीज, अदानी पोर्ट्स आणि मारुती सुझुकी यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती. तर दिवीज लॅब, टाटा कन्झ्युमर, एचयुएल, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू होण्याची अपेक्षा होती. गिफ्ट निफ्टीमधून शेअर बाजाराचं कामकाज जोरदार सुरू होण्याचे संकेत मिळत होते. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई शेअर बाजार तेजीत होते. भारतातील कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे शेअर बाजारातील भावना सकारात्मक झाल्याचं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
निर्देशांक आजवरच्या उच्चांकी स्तरावर
मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा घसरण दिसून आली. सोमवारी शेअर बाजारानं आजवरचा उच्चांकी स्तर गाठला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ऑटो शेअर्स सारख्या दिग्गजांच्या वाढीमुळे शेअर बाजारात बंपर तेजी दिसून आली. शेअर बाजारातील तज्ज्ञांना कंपन्यांचे गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट असू शकतात अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली.