Join us  

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; IT इंडेक्समध्ये घसरण, अपोलो हॉस्पिटलमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 9:37 AM

Opening Bell Today: शुक्रवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स २५२ अंकांच्या मजबुतीसह ७४,२२७ वर उघडला.

Opening Bell Today: शुक्रवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स २५२ अंकांच्या मजबुतीसह ७४,२२७ वर तर निफ्टी ७६ अंकांच्या मजबुतीसह २२,५६४ वर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी आयटी निर्देशांकात घसरण नोंदविली जात होती, तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अपोलो हॉस्पिटल्स, अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स, लार्सन आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या समभागांचा समावेश होता, तर इन्फोसिस, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, एलटीआय माइंडट्री आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. 

प्री ओपन मार्केटची स्थिती 

चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स प्री-ओपन मार्केटमध्ये ७४,२०८ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे ८० अंकांच्या मजबुतीसह २२,५६८ अंकांवर काम करत होता. एक्झिट पोलची आकडेवारी आणि निवडणूक निकालामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. राजकीय घडामोडींचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो.  

मान्सूनचं लवकर आगमन झाल्यानं उत्साह 

मान्सूनचं केरळमध्ये लवकर आगमन होणं ही देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी असल्याचं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या ५ दिवसांत निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी येत आहे. यासोबतच शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे येणार आहेत. यावरही सोमवारी शेअर बाजाराची प्रतिक्रिया पाहायला मिळू शकते.

टॅग्स :शेअर बाजार