Stock Market Open: शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात बुधवारी घसरणीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 218 अंकांनी घसरून 73193 अंकांवर तर निफ्टी 80 अंकांनी घसरून 22222 अंकांवर उघडला. कोल इंडिया लिमिटेड, मारुती सुझुकी, बीपीसीएल, एसबीआय, आयटीसी, अॅक्सिस बँक आणि टाटा स्टील यांचे शेअर्स वधारले, तर डॉ. रेड्डीज, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, अपोलो हॉस्पिटल्स, एचडीएफसी बँक आणि डिव्हिस लॅब यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये कार्यरत होते.
प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स 287 अंकांनी घसरून 73,225 अंकांवर तर निफ्टी 71 अंकांनी घसरून 22,231 च्या पातळीवर व्यवहार करत होता. मंगळवारी सुरुवातीच्या कामकाजातील तेजीनंतर शेअर बाजार बंद होताना घसरण दिसून आली होती.
अमेरिकेतून मजबूत संकेत
भारतात कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे कमकुवत निकाल आणि निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारावर परिणाम होत आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मजबुतीनंतर मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीची अपेक्षा वाढली असून, कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही दिसू शकतो. 22137 ची पातळी निफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाची असून हा सपोर्ट तुटला तर निफ्टी मोठी घसरण नोंदवू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.