गुरुवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीनं सुरुवात झाली. सुरुवातीच्या कामकाजात बीएसई सेन्सेक्स 228 अंकांच्या वाढीसह 72053 अंकांच्या पातळीवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 58 अंकांच्या वाढीसह 21898 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. दरम्यान, 9.40 च्या सुमारास सेन्सेक्स 56.43 अंकांच्या घसरणीसह 71766.44 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 18.55 अंकांच्या घसरणीसह 21,821.60 अंकांवर पोहोचला.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. दरम्यान महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, एनटीपीसी, टीसीएस, एलटीआय माइंडट्री, यूपीएल आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, अपोलो हॉस्पिटल आणि ब्रिटानियाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजादरम्यान एचसीएल टेक, कोल इंडिया, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 230 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता तर निफ्टी 21890 अंकांच्या पातळीवर काम करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स तीन टक्क्यांनी वधारले होते, तर पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या वाढीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत होता.