Stock Market Open: बुधवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झालं. BSE सेन्सेक्स 224 अंकांच्या वाढीसह 73963 अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 53 अंकांच्या वाढीसह 22421 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांकात वाढ दिसून आली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ झालेल्या शेअर्सबद्दल बोलायचं तर, यामध्ये नेस्ले इंडिया, सिप्ला, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, बीपीसीएल, हीरो मोटोकॉर्प आणि कोल इंडिया या शेअर्सचा समावेश आहे. तर सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्सच्या यादीत टाटा कन्झ्युमर, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, इन्फोसिस, ब्रिटानिया, आयटीसी आणि पॉवर ग्रिड यांचा समावेश होता.
प्री ओपन सेशन
शेअर बाजारातील कामकाज बुधवारी तेजीसह सुरू होण्याची अपेक्षा होती. प्री ओपन सत्रात, बीएसई सेन्सेक्स 200 अंकांच्या वाढीसह 73957 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 53 अंकांच्या वाढीसह 22421 अंकांच्या पातळीवर काम करत होता. गिफ्ट निफ्टीमधून शेअर बाजाराचे कामकाज सकारात्मक पद्धतीनं सुरू होण्याचे संकेत मिळत होते.
टेस्लाची घोषणा
अमेरिकन शेअर बाजार वॉल स्ट्रीटमध्ये मंगळवारच्या तेजीमुळे बुधवारी आशियाई शेअर बाजारात तेजी होती. टेस्लानं नवीन मॉडेलची कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 83 डॉलरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत, यामुळे शेअर बाजाराच्या कामकाजातही मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.