पाकिस्तानच्याशेअर बाजाराच्या इमारतीला आग लागल्याने अचानक शेअर बाजाराचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत. जिओ टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. कराची स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवरही ट्रेडिंग सस्पेंड करण्यात आल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानचा शेअर बाजार हा कराचीमध्ये आहे. पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज (PSX) च्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाची वाहने आग विझविण्यासाठी पोहोचली आहे. सर्व कर्मचारी, ट्रेडरना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. सध्या तरी स्टॉक एक्स्चेंजचे काम पुन्हा कधी सुरु होईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानी शेअर बाजारही उच्चांकावर...
पाकिस्तानी गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या लेखाजोख्याच्या पार्श्वभूमीवर आकर्षक लाभांश देण्याची अपेक्षा आहे. यामुळे गुंतवणूकदार उत्साहात आहेत. भारताप्रमाणे पाकिस्तानातही शेअर बाजार 80,000 अंकांवर गेला आहे. IMF सोबत सुमारे एका महिन्यात कर्ज करार केल्याचाही परिणाम पाकिस्तानी शेअर बाजारावर दिसला व उच्चांक गाठला.
गेल्या शुक्रवारी शेअर बाजार 1,768 अंकांच्या वाढीसह 80,213 अंकांवर बंद झाला होता. सरकारने घरगुती ग्राहकांसाठी वीज दर 51% ने वाढवले आहेत. कर्ज कराराच्या अटींवर चर्चा करण्यासाठी IMF चे शिष्टमंडळ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाकिस्तानला भेट देणार आहे.