बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सच्या स्टॉकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत अपर सर्किट पाहायला मिळत आहे. आज तर पतंजली फूड्सच्या स्टॉकनं उच्चांक गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, अलीकडेच पतंजली समूहाने आपली पुढील ५ वर्षांची योजना, ग्रूप कंपन्यांच्या IPO ची योजना जाहीर केली. याचाच सकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांनी दाखवला आहे. त्यामुळे शेअरमध्ये खरेदी होताना दिसत आहे. पतंजली फूड्स ही पतंजली ग्रूपची एकमेव लिस्टेड कंपनी आहे. हा समूह पुढील ५ वर्षांत आणखी ४ कंपन्यांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे.
आजच्या शेअरमध्ये अपर सर्किट असून शेअर ५ टक्क्यांनी वाढून १४७१.५ च्या पातळीवर पोहोचला आहे. स्टॉकसाठी वरचा बँड ५ टक्के इतका आहे. स्टॉकचा एक वर्षाचा निच्चांक ७०६ इतका राहिला आहे. आजच्या वाढीसह कंपनीचे बाजारमूल्य ५३ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. त्याच वेळी, स्टॉकने गेल्या एका महिन्यात ३३ टक्के परतावा दिला आहे. ब्रोकरेज कंपन्यांचा अंदाज आहे की, आगामी काळात शेअरमध्ये आणखी तेजी दिसून येईल. IIFL सिक्युरिटीजच्या मते, अल्पावधीत शेअर १७०० च्या पातळीला स्पर्श करू शकतो.
पतंजली ग्रूपची योजना काय?
शेअर वाढण्याचे मुख्य कारण पतंजली समूहाच्या भविष्यातील योजना हे आहे. किंबहुना, बाबा रामदेव यांनी माहिती दिली आहे की, येत्या पाच ते सात वर्षांत समूहाचा व्यवसाय अडीच पटीनं वाढून एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की, पतंजली समूह आपल्या चार कंपन्यांचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. पतंजली मेडिसिन, पतंजली लाइफस्टाइल आणि पतंजली वेलनेस पुढील 5 वर्षांत लिस्ट होतील. या कालावधीत ५ लाख नोकऱ्या देण्याचीही समूहाची योजना आहे. यापुढील अंदाज पाहता शेअरमध्ये खरेदी होताना दिसत आहे.