Join us  

Paytm चे बॉस पुन्हा अडचणीत, IPO गैरव्यवहारप्रकरणी SEBIची विजय शेखर शर्मांसह अनेकांना कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 4:15 PM

यानंतर कंपनीचा शेअर जोरदार आपटला. पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण.

 Paytm SEBI : पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचे संस्थापक विजय शेखर शर्मा आणि आयपीओच्या वेळी संचालक मंडळाचे सदस्य असलेल्यांना बाजार नियामक सेबीनं (SEBI) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ही नोटीस खोटी माहिती सादर करण्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे. पेटीएमचा आयपीओ नोव्हेंबर २०२१ मध्ये आला होता. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. पेटीएमचा शेअर शुक्रवारच्या बंदच्या तुलनेत ४.४८ टक्क्यांनी घसरला.

काय आहे प्रकरण?

पेटीएमला बजावण्यात आलेल्या या नोटीसमध्ये प्रमोटर क्लासिफिकेशन नियमांचं कथितरित्या पालन न केल्याचा आरोप करण्यात आलाय. रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आल्याचं अहवालात म्हटले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या चौकशीनंतर रिझर्व्ह बँकेनं या वर्षाच्या सुरुवातीला कडक कारवाई केली होती.

सेबीच्या नोटीसमध्ये काय?

रिपोर्टनुसार, सेबीच्या नोटीसचा मुख्य मुद्दा विजय शेखर शर्मा यांना प्रवर्तक म्हणून समोर आणायला हवा होता का? हा आहे. जेव्हा कंपनीचा आयपीओ आला तेव्हा केवळ एका कर्मचाऱ्याऐवजी व्यवस्थापनावरही त्यांचे नियंत्रण होतं. सेबीनं त्या वेळच्या संचालकांनाही नोटिसा बजावल्या आहेत. विजय शेखर शर्मा यांच्या या निर्णयाचे समर्थन का करण्यात आलं, असा सवाल सेबीनं आपल्या नोटीसमध्ये केला आहे. सेबीच्या नियमांनुसार, जर विजय शेखर शर्मा यांना प्रवर्तक म्हणून आणलं गेलं तर ते एम्पलॉयी स्टॉक ऑप्शनसाठी (ESOPs) पात्र ठरत नाहीत.

सेबीच्या नियमांनुसार, जोपर्यंत एखादी कंपनी प्रोफेशनली मॅनेज्ड घोषित करत नाही, तोपर्यंत तो प्रवर्तकाद्वारे चालविला जातो असं मानलं जातं. प्रोफेशनल मॅनेजमेंटसाठी एखाद्या कंपनीचा १० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आणि एका हिस्सेदाराचं नियंत्रण असू नये.

पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण

पेटीएमचा शेअर आज बीएसईवर ५६० रुपयांवर उघडला, जो शुक्रवारच्या बंदच्या तुलनेत अधिक होता. काही काळानंतर कंपनीचा शेअर ५६५.४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर ५३० रुपयांवर बंद झाला.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :पे-टीएमसेबी