Paytm Share Price: गेल्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. पेटीएमचे शेअर गेल्या ५ महिन्यांमध्ये १२० टक्क्यांपेक्षा अधिक वधारलेत. कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या कालावधीतही तेजी दिसून येऊ शकते. ब्रोकरेज हाऊस सिटीनं (Citi) पेटीएमची पॅरेंट कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सच्या शेअर्सचं रेटिंग अपग्रेट केलं आहे. सिटीनं पेटीएमच्या शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिलाय. यापूर्वी ब्रोकरेज हाऊसनं पेटीएमच्या शेअर्सना सेल रेटिंग दिलं होतं.
सिटीनं दिलं ९०० रुपयांचं टार्गेट प्राईज
ब्रोकरेज हाऊस सिटीनं (Citi) पेटीएमच्या शेअर्सच्या टार्गेट प्राइसमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ केलीये. सिटीनं पेटीएमच्या शेअर्ससाठी ९०० रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित केलीये. ब्रोकरेज हाऊसनं यापूर्वी कंपनीच्या शेअर्ससाठी ४४० रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली होती. म्हणजेच बुधवारच्या बंदच्या पातळीवरून कंपनीच्या शेअर्समध्ये २२ टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते.
पेटीएम शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ९५२.६० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३१० रुपये आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचं मार्केट कॅप ४८,४७७ कोटी रुपयांच्या पुढे गेलंय.
५ महिन्यांत १२० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ
पेटीएमच्या शेअरमध्ये गेल्या ५ महिन्यांत १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २४ मे २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३४०.९५ रुपयांवर होता. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पेटीएमचा शेअर बीएसईवर ७६२ रुपयांवर पोहोचला. गेल्या ६ महिन्यांत पेटीएमच्या शेअरमध्ये जवळपास ९८ टक्क्यांची वाढ झालीये. २४ एप्रिल २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३८२.६५ रुपयांवर होता. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पेटीएमचा शेअर ७६० रुपयांच्या वर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत पेटीएमच्या शेअर्समध्ये जवळपास १८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०२१ मध्ये आलेला आयपीओ
पेटीएमचा आयपीओ ८ नोव्हेंबर २०२१ रोजी उघडला आणि १० नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत २१५० रुपये होती. कंपनीचा शेअर १८ नोव्हेंबर २०२१ रोजी बीएसईवर १९५५ रुपयांवर लिस्ट झाला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)