Join us  

Paytm Share Price: पुन्हा ₹४०० च्या खाली आला शेअर, केव्हा थांबणार ही घसरण? काय म्हणाले एक्सपर्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:54 AM

 नियामक समस्यांना तोंड देत असलेल्या पेटीएमच्या शेअर्सवरील विक्रीचा दबाव थांबताना दिसत नाही.

Paytm Share Price:  नियामक समस्यांना तोंड देत असलेल्या पेटीएमच्या शेअर्सवरील विक्रीचा दबाव थांबताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा कंपनीचा शेअर ४०० रुपयांच्या खाली घसरला. ब्रोकरेजनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कंपनीचे शेअर्स ३०० रुपयांच्या खाली जाऊ शकतात. विदेशी ब्रोकिंग फर्म मॅक्वेरीनं (Macquarie) याचं रेटिंग डाऊनग्रेड करत अंडरपरफॉर्म केलंय. याशिवाय त्याच्या टार्गेट प्राईजमध्येही मोठी कपात केली आहे. शेअर्सच्या आजच्या हालचालींबद्दल बोलायचं झालं तर, तो  ६.७७ टक्क्यांच्या घसरणीसह ३९४ रुपयांवर ट्रेड करत होता. तर इंट्रा-डेमध्ये तो ८.७२ टक्क्यांनी घसरून ३८५.७५ रुपयांवर आला. 

कुठपर्यंत येऊ शकतो भाव? 

विदेशी ब्रोकिंग फर्म मॅक्वेरीने पेटीएमचं टार्गेट प्राईज ६५० रुपयांवरून २७५ रुपये केली आहे. ही टार्गेट प्राईज पेटीएमच्या इश्यू प्राईजपेक्षा ८७ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना २१५० रुपयांच्या किमतीत शेअर्स जारी करण्यात आले. विश्लेषक सुरेश गणपथी यांच्या म्हणण्यानुसार पेटीएम सध्या अशा समस्यांना तोंड देत आहे की त्यांचे ग्राहक कमी होऊ शकतात. जर त्यांनी ग्राहक गमावले तर त्यांची कमाई आणि व्यवसायाच्या मॉडेलला मोठा फटका बसू शकतो. ब्रोकरेजनं आर्थिक वर्ष २०२५ साठी तुटीचा अंदाज १७० टक्के आणि आर्थिक वर्ष २०२६ चा अंदाज ४० टक्क्यांनी वाढवला आहे. 

रिझर्व्ह बँकेकडून कारवाई 

रिझर्व्ह बँकेनं गेल्या महिन्यात ३१ जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या महत्त्वपूर्ण व्यवसायावर बंदी घातली होती. याअंतर्गत २९ फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी घेता येणार नाहीत आणि क्रेडिटचे व्यवहारही करता येणार नाहीत. आरबीआयनं याबद्दल संपूर्ण तपशील सार्वजनिक केला नसला तरी, त्याच्याशी संबंधित एक FAQ लवकरच जारी केला जाऊ शकतो. "कोणत्याही रेग्युलेटेड एन्टिटिवर अशा प्रकारची कारवाई अत्यंत सखोल मूल्यांकनानंतरच केली जाते, त्यामुळे या कारवाईचा आढावा घेण्यास वाव नाही," असं सोमवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील ब्रोकरेजची आणि तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजारशेअर बाजारभारतीय रिझर्व्ह बँक