Paytm share price: विजय शेखर शर्मा यांच्या कंपनी Paytm (One97 Communications) च्या शेअर्ससाठी 5 फेब्रुवारीचा दिवसही वाईट ठरला. शेअर बाजार उघडताच, शेअर बीएसईवरील मागील बंद किमतीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी घसरला आणि 438.35 रुपयांवर लोअर सर्किटवर पोहोचला. स्टॉकसाठी हा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. कंपनीचे मार्केट कॅप 27,838.75 कोटी रुपयांवर घसरलं आहे. हा सलग तिसरा दिवस आहे जेव्हा पेटीएमचे शेअर्स लोअर सर्किटवर आलेत.
तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये पेटीएमचे शेअर्स 42.4 टक्क्यांनी खाली आहेत आणि गुंतवणूकदारांचं 20,500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. बीएसई आणि एनएसईनं पेटीएम शेअर्सची लोअर सर्किट मर्यादा 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. निधीच्या गैरवापराचा कोणताही नवीन आरोप झाल्यास, सक्तवसूली संचालनालय पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू करेल, असं वक्तव्य महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी केलं. यानंतर पेटीएमसमोरील संकट अजून वाढलंय.
कंपनीचे सहयोगी किंवा संस्थापक आणि सीईओ यांच्याविरुद्ध ईडी कोणत्याही प्रकारची चौकशी करत नसल्याचं One97 Communications नं स्पष्ट केलंय.
आरबीआयच्या कारवाईचा परिणाम
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पेटीएम पेमेंट बँकेला (Paytm Payment Banks or PPBL) 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात ठेवी किंवा टॉप-अप, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट आणि फास्टॅग इत्यादी स्वीकारण्यास प्रतिबंध केला आहे. परंतु, कोणतंही व्याज, कॅशबॅक किंवा परतावा पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या ग्राहकांना कधीही जमा केला जाऊ शकतो. आरबीआयच्या या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)