Paytm shares down: बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी सुरुवातीच्या कामकाजादरम्यान पेटीएमचे शेअर्स 9 टक्क्यांनी घसरले. खरं तर, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सवरी संकट संपण्याचं नाव घेत नाहीये, त्यामुळे शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 14 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) कंपनीचे शेअर्स 8.59 टक्क्यांच्या घसरणीसह 347.50 रुपयांवर व्यवहार करत होते.
ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजेच 998.3 वर पोहोचले होते. तेव्हापासून या शेअरमध्ये 65.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. रिझर्व्ह बँकेनं 31 जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादल्यानंतर अधिक घसरण दिसून आली. 31 जानेवारीपासून पेटीएमच्या शेअर्सचं मूल्य निम्म्याहून अधिक कमी झालं आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 53 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकनं (आरबीआय) कारवाई करून दोन आठवडे होत आहेत. दरम्यान, पेटीएम पेमेंट्स बँकेनं कम्प्लायन्स मजबूत करण्यासाठी एक समिती देखील स्थापन केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँक याबाबत थोडीही नरमी दाखवण्याच्या स्थितीत नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयनं केलेल्या कारवाईचा आढावा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं बँकिंग नियामकानं यापूर्वीच स्पष्ट केलंय. ही कारवाई घाईघाईनं करण्यात आली नसून, अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचंही सांगण्यात आलंय.