Join us  

Paytm च्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट, यामागे आहे मोठं कारण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:43 PM

Paytm Share Price: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशनच्या शेअर्समध्ये आज पुन्हा ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. आज सलग तिसऱ्या दिवशी पेटीएम कंपनीच्या शेअर्सनं अपर सर्किटला धडक दिली. पाहा काय आहे यामागील कारण.

Paytm Share Price: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशनच्या शेअर्समध्ये आज पुन्हा ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. आज सलग तिसऱ्या दिवशी पेटीएम कंपनीच्या शेअर्सनं अपर सर्किटला धडक दिली. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागचे कारण म्हणजे ब्लॉक डील. कंपनीच्या ७५.२० लाख शेअर्सची खरेदी-विक्री झाली आहे. हे पेटीएमच्या १.२ टक्के शेअर्सइतकं आहे. 

कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट 

बीएसईमध्ये कंपनीचा शेअर ३८६ रुपयांच्या पातळीवर उघडला. पण काही वेळानंतर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३९६.३५ रुपयांवर पोहोचला. मात्र, काही काळानंतर कंपनीचे शेअर्स १ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ३८४.१५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. ब्लॉक डील ३९१ रुपये प्रति शेअर या दराने करण्यात आली. म्हणजेच एकूण २९६.३० कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. ब्लॉक डीलची किंमत गुरुवारच्या ३७७.४० रुपयांच्या बंदपेक्षा ३.६ टक्क्यांनी जास्त आहे. 

... तो दावा कंपनीनं फेटाळला 

गेल्या आठवडाभरात पेटीएमच्या शेअरच्या किमतीत तेजी पाहायला मिळाली आहे. गौतम अदानी वन९७ कम्युनिकेशन्समध्ये हिस्सा खरेदी करू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, पेटीएमने ही चर्चा फेटाळून लावली. असा कोणताही व्यवहार झाल्यास त्याची माहिती सेबीला दिली जाईल, असं कंपनीनं म्हटलंय. 

ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ५५.८० टक्क्यांची घसरण झाली आहे. तर वर्षभर शेअर ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांच्या शेअरच्या मूल्यात ४५ टक्के घसरण झाली होती. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजार