Jio Financial Services share price : मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे (Jio Financial Services share price) शेअर्स सध्या चर्चेत आहेत. मंगळवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला आणि २६३.३० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडनं नुकत्याच दिलेल्या एक्स्चेंज फायलिंगमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली.
जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त उपक्रमानं २० जानेवारी २०२५ पर्यंत 'जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड' नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी ब्रोकिंग उपक्रमांमध्ये सक्रीय असेल, असं कंपनीनं म्हटलं. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ३९४.७० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २३७.०५ रुपये आहे.
काय आहे माहिती?
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकरॉकसोबत भागीदारीत प्रत्येकानं सप्टेंबर २०२४ मध्ये स्थापन झालेल्या जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ३ कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिसऱ्या २९५ कोटी रुपयांवर स्थिर राहिला. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २९४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ६८९ कोटी रुपये होता.
आलोच्य तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून ४४९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ४१४ कोटी रुपये होते. एकूण खर्चातही वार्षिक आधारावर वाढ झाल्याचे दिसून आलंय. गेल्या वर्षी याच तिमाहीत ९९ कोटी रुपयांवरून ते १३१ कोटी रुपयांवर पोहोचलं. डिसेंबरमध्ये संपलेल्या नऊ महिन्यांत कंपनीचा निव्वळ नफा किरकोळ सुधारून १,२९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत १,२९४ कोटी रुपये होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)