Join us

PhonePe नं Stock Broking बिझनेसमध्ये घेतली एन्ट्री, पाहा नफ्यात येण्यासाठी काय करतेय कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 15:22 IST

फिनटेक कंपनी फोन पे नं आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक नवीन फीचर लाँच केलं आहे.

फिनटेक (Fintech) कंपनी फोन पेनं (PhonePe) आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. कंपनीनं ३० ऑगस्ट रोजी स्टॉक ब्रोकिंगमध्ये एन्ट्री केली. यासाठी Share.Market नावाचं अॅपही सुरू करण्यात आलंय. या PhonePe अॅपद्वारे लोकांना स्टॉक, म्युच्युअल फंड आणि ईटीएफ अर्थात एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक करता येणारे. फोन पे नं (PhonePe) ने २०२१ मध्येच स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्यासाठी ते फक्त शेअर बाजार नियामक सेबीच्या लायसन्सची वाट पाहत होते. स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश केल्यानंतर, आता फोन पेची थेट स्पर्धा झिरोदा (Zerodha), ग्रो (Groww) आणि अपस्टॉक्स (Upstox) सारख्या प्लॅटफॉर्म्सशी होणार आहे. आपल्या कंपनीनं सुमारे ४ वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशन सुरू केलं होतं आणि आता त्यांनी PhonePe वेल्थ या सब्सिडायरी कंपनीद्वारे स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश केला असल्याचे कंपनीचे सीईओ समीर निगम म्हणाले. 2022 मध्ये, फोन पे नं WealthDesk आणि OpenQ या दोन वेल्थटेक प्लॅटफॉर्मचं अधिग्रहण केलं. दोघांच्या एकूण मूल्यांकनाबद्दल सांगायचं झालं तर ते सुमारे ७ कोटी डॉलर होते. या अधिग्रहणाद्वारे, फोन पे आर्थिक सेवांमध्ये आपली पोहोच वाढवू इच्छित आहे. कंपनीनं स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश करण्यासंदर्भात एक ट्वीट देखील केलं होतं.

२०२५ पर्यंत कंपनी नफ्यात येणारदरम्यान, कंपनीचे सीईओ समीर निगम यांनी २०२५ पर्यंत कंपनी नफ्यात येईल असं म्हटलंय. कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कंपनीला अद्यापही नफ्यात येता आलेलं नाही. गेल्या काही महिन्यांत PhonePe आपला व्यवसाय झपाट्यानं वाढवत आहे. कंपनीनं व्यवसाय वाढीच्या दृष्टीनं इतर अनेक सेवा सुरू केल्या आहेत.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक