Join us

Polycab India Share Price : BSNL कडून 'या' दिग्गज कंपनीला मिळाली ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 3:16 PM

वास्तविक या कंपनीने भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) एका प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली आहे. या बातमीनंतर पॉलीकॅबच्या शेअरवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या

Polycab India Share Price : शेअर बाजारातील बहुतांश शेअर्समध्ये तेजी कंपनीशी संबंधित सकारात्मक बातम्यांमुळे येते. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्येही अशीच वाढ झाली आहे. वास्तविक या कंपनीने भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) एका प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली आहे. या बातमीनंतर पॉलीकॅबच्या शेअरवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या. बीएसई निर्देशांकावर पॉलीकॅब इंडियाचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वधारून ६९३४.१५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. 

१५ ऑक्टोबर २०२४ रोजी हा शेअर ७,६०७.१५ रुपयांवर पोहोचला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. जानेवारी २०२४ मध्ये हा शेअर ३,८१२.३५ रुपयांवर होता. शेअरची ही ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे. गेल्या वर्षभरात पॉलीकॅब इंडियाच्या शेअरमध्ये सुमारे ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

काय म्हणाली कंपनी?

पॉलीकॅब इंडियानं शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती दिली. कर्नाटक, गोवा आणि पुद्दुचेरीमध्ये भारतनेटच्या मिडल माईल नेटवर्कचे कन्स्ट्रक्शन, अपग्रेडेशन, संचालन आणि देखभालीसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. कंपनी डिझाइन, बिल्ड, ऑपरेट अँड मेंटेन (डीबीओएम) मॉडेलवर प्रकल्प सुरू करणार आहे. या ऑर्डरची साईज ४०९९.६९ कोटी रुपये आहे, असं कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. कंपनी तीन वर्षांत मिडल माईल नेटवर्क तयार करेल.

करारानुसार पॉलीकॅब इंडिया या प्रकल्पासाठी १० वर्षांसाठी मेंटेनन्सही करणार आहे. यासाठी पहिल्या पाच वर्षांसाठी वार्षिक भांडवली खर्चाच्या ५.५ टक्के आणि पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक भांडवली खर्चाच्या ६.५ टक्के खर्च येणार आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारबीएसएनएल