Stock Market Tricks : गेल्या ३ महिन्यापासून शेअर बाजार प्रचंड अस्थीर आहे. आज उसळी तर उद्या थेट तळाला, अशी परिस्थिती वारंवार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत लार्ज कॅप असलेले दिग्गज स्टॉक्सनेही सपाटून मार खाल्ला आहे. अशा परिस्थितीत या घसरणीत तुमचे गुंतवणुकीचे राजवाडे कोसळू नयेत, यासाठी तुम्हाला पोर्टफोलिओ व्यवस्थापनाच्या खेळातील बारकावे समजून घ्यावे लागतील. निदान फायदा नसला तरी तोटा तरी होता कामा नये. अशा वेळी तुमच्या भावनांवर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे. यासाठी काही नियम पाळले तर तुमचं नुकसान सोडा पण फायदा नक्की होईल.
फंडामेंटल आणि मूल्य तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका
शेअर बाजाराच्या इतिहासात अनेकवेळा बाजार ५० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचं झालं तर कोरोनामध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा घटना टाळण्यासाठी गुंतवणुकीपूर्वी संबंधित कंपनीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कंपनीचे बाजार भांडवल आणि मूल्य तपासा. कंपनीचे शेअर्स त्यांच्या वाजवी मूल्यापेक्षा कमी दराने खरेदी करण्याचा प्रयत्न असावा. असे केल्यास बाजार कोसळला तरी कमीत कमी नुकसान होणार आहे. तर बाजार वर गेला तर चांदीच चांदी. त्यामुळे कंपनीच्या खऱ्या मूल्यांकनापेक्षा कमी दराने शेअर्स खरेदी करणे हा सर्वात मोठा गुरुमंत्र आहे. जो दीर्घकालीन गुंतवणुकीत कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुमचा पोर्टफोलिओ ढासळू देणार नाही.
गुंतवणुकीतील संयम
शेअर बाजार कोसळल्यानंतर तो पुन्हा उसळी घेतोच, हा इतिहास आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत शेअर बाजारातून नफा वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेअर बाजाराबद्दल आशावादी राहा आणि दीर्घकालीन गुंतवणूक करा. त्यामुळे संयम न गमावता योग्य दिशेने गुंतवणूक करत रहा.
ध्येयाशिवाय गुंतवणूक करू नका
केवळ नफा कमवायचा म्हणून शेअर बाजारात गुंतवणूक करू नये. तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीमागे काहीतरी ध्येय असणे आवश्यक आहे. अन्यथ कधी बाहेर पडावे हेच समजणार नाही. उदा. तुम्हाला २ वर्षांनी गाडी घ्यायची असेल. किंवा मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही गुंतवणूक करत आहात. अशा स्थितीत कधी एक्झिट घ्यायची याची कल्पना तुम्हाला असते. ध्येयाशिवाय गुंतवणूक करणे म्हणजे भरकटलेले जहाज आहे. कुठे पोहचेल काही तपास नसतो.
(Disclaimer- यामध्ये शेअर बाजाराविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)