Join us

NTPC Green IPO च्या प्राईज बँड आणि तारखेची माहिती आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 9:06 AM

NTPC Green IPO : देशातील हरित ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. ही एक सरकारी कंपनी असून याचं नाव एनटीपीसी ग्रीन एनर्जी आहे.

NTPC Green IPO : देशातील हरित ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. ही एक सरकारी कंपनी असून याचं नाव एनटीपीसी ग्रीन एनर्जी (NTPC Green Energy) आहे. ही एनटीपीसी या सरकारी कंपनीची ग्रीन एनर्जी कंपनी आहे. १०,००० कोटी रुपयांच्या या आयपीओसाठी प्राईज बँडही निश्चित करण्यात आला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओसाठी प्राइस बँड १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर असेल. एका लॉटमध्ये गुंतवणूकदारांना १३८ शेअर्स मिळतील. म्हणजेच यामध्ये १४,९०४ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि २२ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद होईल. एक दिवस आधी बिझनेस न्यूज एजन्सी ब्लूमबर्गनं सूत्रांच्या हवाल्यानं, कंपनी १२ अब्ज डॉलर्सचं मूल्यांकन निश्चित करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं होतं. १२ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल.

यापूर्वी वारी एनर्जी झालेली लिस्ट

गेल्याच महिन्यात आणखी एक ग्रीन एनर्जी कंपनी वारी एनर्जीज (Waaree Energies) लिस्ट झाली आहे. वारी एनर्जीजनं या आयपीओच्या माध्यमातून ४३२१.४४ कोटी रुपये उभे केले आहेत. हा आयपीओ ७० पट सब्सक्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणुकदारांव्यतिरिक्त गोल्डमन सॅक्स, ब्लॅकरॉक आणि मॉर्गन स्टॅनली सारख्या बड्या कंपन्यांनीही सहभाग घेतला होता.

सरकारचाही पाठींबा

रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात भारतीय गुंतवणूकदारांचा रस वाढताना दिसत आहे. मोदी सरकार देशात रिन्युएबल एनर्जीला प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहे. देशात रिन्युएबल एनर्जीला प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेच्या माध्यमातून गेल्या दशकात सुमारे १०० गिगावॅट क्षमतेची भर पडली आहे. एसीएमई सोलर होल्डिंग्स देखील ३४४ दशलक्ष डॉलर्सचा आयपीओ लाँच करण्याच्या विचारात आहे. या आयपीओला किरकोळ आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडूनही जोरदार मागणी दिसून येत आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :सरकारशेअर बाजारगुंतवणूक