Join us

वर्षभरात ४५ टक्क्यांनी भाव वधारला, रेखा झुनझुनवाला यांनी 'या' सरकारी बँकेत वाढवला हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 4:41 PM

शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी एका सरकारी बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत.

शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी एका सरकारी बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार कॅनरा बँकेतील आपला हिस्सा वाढवला आहे. गेल्या वर्षभरात या सरकारी बँकेने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. झुनझुनवाला यांनी ऑगस्ट 2021 मध्ये कॅनरा बँकेचा स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडला. राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या स्टॉक पोर्टफोलिओ आणि प्रॉपर्टी मॅनेज करत आहेत.

तिसर्‍या तिमाहीच्या आकडेवारीनुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कॅनरा बँकेचे 3,75,97,600 शेअर्स आहेत. नव्या गुंतवणूकीसह कॅनरा बँकेतील त्यांचा हिस्सा 2.07 टक्क्यांवर गेलाय. सप्टेंबर तिमाहीपर्यंत रेखा झुनझुनवाला यांचा कॅनरा बँकेत एकूण हिस्सा केवळ 1.48 टक्के होता. ट्रेंडलीनच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 33,230.35 कोटी रुपये होती. जे जानेवारीमध्ये आतापर्यंत 33,061.17 कोटी रुपये झाले आहे. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील टॉप 5 कंपन्या टायटन, स्टार हेल्थ, मेट्रो ब्रँड्स, टाटा मोटर्स आणि कॅनरा बँक आहेत.

शुक्रवारी कॅनरा बँकेचा शेअर 2.18 टक्क्यांनी घसरून 320.35 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 45 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या सरकारी बँकेचे मार्केट कॅप 58,115 कोटी रुपये आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजार