Join us

पंतप्रधानांची 'टिप' ठरली सुपरहिट: ४८ चा शेअर १७६ वर, ३३५ च्या स्टॉकने पाडला पैशांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 12:52 PM

पाहा कोणत्या आहेत या कंपन्या ज्यांनी गुंतवणूकदारांना केलंय मालामाल.

Multibagger Stocks:  ऑगस्ट २०२३ मध्ये सभागृहात केलेल्या भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदारांना खास प्रकारच्या टिप्स दिल्या होत्या. ज्या सरकारी कंपन्यांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे, त्यांच्यातच गुंतवणूक केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला होता. पीएम मोदींनी हे विनोदी पद्धतीनं सांगितलं असलं तरी या भाषणाच्या सहा महिन्यांतच बहुतांश सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड व्यतिरिक्त, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC), हुडको (HUDCO), एसजेव्हिएन (SJVN) लिमिटेड आणि कोचीन शिपयार्ड या कंपन्यांचा यात प्रामुख्यानं समावेश आहे. या टॉप 5 शेअर्सनं गेल्या सहा महिन्यांत किती रिटर्न दिले हे पाहू. 

NBCC (India) लिमिटेड: हाऊसिंग क्षेत्राशी संबंधित या कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना 250 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 5 फेब्रुवारी रोजी शेअरचा भाव 176.50 रुपयांवर गेला होता, जो 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. विशेष म्हणजे 10 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या दिवशी हा शेअर 48 रुपयांवर व्यवहार करत होता. 

IRFC: या रेल्वे फायनान्स कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचं तर, ऑगस्ट 2023 मध्ये हा शेअर 50 रुपयांच्या पातळीवर होता. परंतु 23 जानेवारी 2024 रोजी तो 193 रुपयांवर पोहोचला. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 200 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. 

हुडको : ऑगस्ट 2023 मध्ये हाऊसिंग क्षेत्राशी संबंधित या कंपनीच्या शेअरची किंमत 68 रुपये होती. त्याच वेळी, 2 फेब्रुवारी 2024 रोजी, शेअरची किंमत 226.95 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर्समध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्पात गृहनिर्माण क्षेत्राबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. 

SJVN लिमिटेड : वीज निर्मिती कंपनीच्या शेअर्सनं 5 फेब्रुवारी रोजी 170.45 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता. पीएम मोदींच्या भाषणाच्या दिवशी शेअरची किंमत 55 रुपयांच्या पातळीवर होती. 

कोचीन शिपर्याड : 10 ऑगस्ट 2023 रोजी कोचीन शिपयार्डच्या शेअरची किंमत 335 रुपये होती. आता या शेअरनं 900 रुपयांची पातळीही ओलांडली आहे. 31 जानेवारी 2024 रोजी शेअरची किंमत 944.65 रुपये झाली होती. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. 

या कालावधीत, सरकारी कंपन्यांचा निर्देशांक बीएसई पीएसयू इंडेक्सचं एकूण मार्केट कॅप 66 टक्क्यांनी वाढून 59.5 लाख कोटी रुपये झालं आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना 23.7 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. या कालावधीत पीएसयू निर्देशांकातील कोणत्याही शेअरनं नकारात्मक परतावा दिलेला नाही. यापैकी २२ शेअर्सनं मल्टीबॅगर परतावा दिला आहे. सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या एसबीआयनंदेखील सहा महिन्यांच्या कालावधीत 12 टक्क्यांची वाढ केली आहे.   

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :नरेंद्र मोदीशेअर बाजार