Stock Market Closing On 3 January 2024: नववर्षाच्या सुरूवातीला पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंगमुळे बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आयटी आणि मेटल शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मात्र, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 536 अंकांच्या घसरणीसह 71,356 अंकांवर तर निफ्टी 148 अंकांच्या घसरणीसह 21,526 अंकांवर बंद झाला.
बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजात बरेच चढ-उतार नोंदवले गेले. दिवसाच्या व्यवहारात एनएसई निफ्टीने 200 अंकांच्या रेंजमध्ये ट्रेड केलं. शेअर बाजार निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये घसरण दिसून येत होती.
कामकाजादरम्यान, बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते, तर हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस आणि एलटीआय माइंड ट्री यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून आली.
अदानींच्या शेअर्समध्ये वाढ
गौतम अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. अदानी एनर्जी सोल्युशन्स 11 टक्के, अदानी टोटल गॅस 10 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पॉवर 5 टक्के, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही 4 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 2 टक्के, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट एक ते दीड टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करत होते.