Closing Bell Today: सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 354 अंकांच्या घसरणीसह 71731 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 82 अंकांनी घसरून 21771 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान घसरण झालेल्या शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास यूपीएलच्या शेअर्समध्ये १२ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि एचडीएफसी लाईफच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकसह सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. टाटा मोटर्स, कोल इंडिया, बीपीसीएल आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र वाढ दिसून आली.
सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजात वाढ नोंदवणाऱ्या शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास सिप्ला, ओएनजीसी आणि महिंद्राच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तरग्रासिम इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
जिओ फायनान्शिअल वधारला
टाटा मोटर्स, कोल इंडिया, बीपीसीएल, सिप्ला, सन फार्मा, ओएनजीसी आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. तर पेटीएम, नवीन फ्लोरिन, एसबीआय कार्ड, शारदा क्रॉप केम आणि वेदांत फॅशनचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. दिवसभराच्या कामकाजादरम्यान शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. जिओ फायनान्शिअलचे (Jio Financial) शेअर्स 15.1 टक्क्यांनी वाढले, पंजाब आणि सिंध बँकेचे शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा जास्त वधारले, तर ओम इन्फ्रा, एनएमडीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, पटेल इंजिनीअरिंग, एक्साइड इंडस्ट्रीज, ब्रँड कॉन्सेप्ट आणि कामधेनू लिमिटेडच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली.
गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी आठ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.