Suzlon Energy : पुण्यातील विंड टर्बाइन कंपनी सुझलॉन एनर्जीला (Suzlon Energy) महिंद्रा समूहाची कंपनी महिंद्रा सस्टेन प्रायव्हेट लिमिटेडकडून 100.8 मेगावॅटची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 2.1 मेगावॅट क्षमतेच्या 48 विंड टर्बाइनच्या पुरवठ्याशी संबंधित आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना पुरविली जाईल. दरम्यान, आज 27 डिसेंबर रोजी सुझलॉन एनर्जीचा शेअर 0.41 टक्क्यांनी किरकोळ वाढून 37.05 रुपयांवर बंद झाला.
सुझलॉन सप्लाय, इंस्टॉलेशन आणि कमीशनिंगसह संपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करेल. याशिवाय प्रकल्पन सुरू झाल्यानंतर ऑपरेशन आणि देखभाल देखील हाताळेल. सुझलॉनचे सीईओ जेपी चालसानी म्हणाले की, "ही ऑर्डर म्हणजे, भारतासाठी जागतिक दर्जाची पवन ऊर्जा तयार करण्यात सुझलॉनच्या कौशल्याची गुणवत्ता आणि आत्मविश्वासाचा पुरावा आहे."
नॉर्डिक एनर्जी कंपनीकडून मिळाली ऑर्डर
सुझलॉनला नॉर्डिक एनर्जी कंपनीकडून 3 मेगावॅट सीरिजसाठी 100.8 मेगावॅटची ऑर्डरही मिळाली आहे. या आदेशानुसार, सुझलॉन S144-140m सीरिजवाले 3.15 मेगावॅट क्षमतेच्या 32 विंड टर्बाइनचा पुरवठा करेल. हा प्रकल्प कर्नाटकात पूर्ण होणार आहे. गेल्या आठवड्यात कंपनीला मिळालेली ही तिसरी ऑर्डर आहे. यापूर्वी गुजरातच्या केपी ग्रुपकडून 193.2 मेगावॅटची ऑर्डर मिळाली होती. हा प्रकल्प भरुच जिल्ह्यातील वागरा आणि विलायत गावात सुरू होईल.
शेअरची कामगिरी
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स गेल्या एका महिन्यात जवळपास 5 टक्क्यांनी घसरले आहेत. पण, गेल्या 6 महिन्यांत 151 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 261 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, गेल्या तीन वर्षांत या शेअरने तब्बल 654 टक्के परतावा दिला आहे.